चिपळूण : मेरा युवा भारत रत्नागिरी आणि लायन्स क्लब सावर्डे आयडीयल यांच्या संयुक्त विद्यमाने शावजीराव लक्ष्मणराव निकम माध्यमिक विद्यालय, कोसबी-फुरूस येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ध्वजारोहणाने झाली. यावेळी संस्थेचे मान्यवर सदस्य, शाळेचे शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर शाळेच्या सभागृहात सकाळी ९.३० वाजता वक्तृत्व स्पर्धा सुरू झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी शिक्षक जाधव सर यांनी पार पाडली.
प्रमुख अतिथी म्हणून मेरा युवा भारत रत्नागिरीचे स्वयंसेवक कु. अनिकेत जाधव, लायन्स क्लब सावर्डे आयडीयलच्या डॉ. वर्षा खानविलकर, डॉ. निलेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी स्पर्धेच्या मूल्यांकनाविषयी मार्गदर्शन करत सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
स्पर्धेत सुमारे १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये ईशा चव्हाण (इ. ९ वी) – प्रथम, रोहन दवंडे (इ. ९ वी) – द्वितीय, कर्तिकी काणेकर (इ. ८ वी) – तृतीय क्रमांक विजेते ठरले. सलोनी काणेकर, मंथन वारे व खूशी जड्यार यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. विषयांमध्ये भारत मातेचे मनोगत, एका क्रांतिकारकाचे मनोगत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत यांचा समावेश होता.
परीक्षक म्हणून गावडे सर व अनिकेत जाधव यांनी काम पाहिले. विजेत्यांना शिल्ड, प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व एक पेन भेट देण्यात आले.
मुख्याध्यापक कळंबे सर यांनी मेरा युवा भारत आणि लायन्स क्लब सावर्डे आयडीयल यांचे आभार मानत अशा उपक्रमांची पुनरावृत्ती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.