रत्नागिरी: जयगड येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना २३ ऑगस्ट रोजी पहाटे घडली. मोहम्मद अकील उस्मान केळकर मुळ राहणार आंबेड बुद्रुक संगमेश्वर, सध्या जयगड असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद केळकर यांना मधुमेह (डायबिटीज) आणि उच्च रक्तदाबाचा (प्रेशर) त्रास होता. त्यांच्यावर रत्नागिरीतील डॉ. औरंगाबादकर यांच्याकडे उपचार सुरू होते आणि ते नियमित औषधे घेत होते.
२३ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास, मोहम्मद केळकर जयगड येथील त्यांच्या खोलीत मित्रांसोबत जेवण करून औषध घेऊन झोपले होते. काही वेळानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या.
त्यांना तात्काळ जयगड येथील जेएसडब्ल्यू ऊर्जा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रुग्णालयात घेऊन जात असतानाच गाडीत त्यांना उलट्या झाल्या आणि ते बेशुद्ध पडले.
अखेरीस जिल्हा रुग्णालयात पोहोचल्यावर तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे केळकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू आहे.
जयगड येथे हृदयविकाराने आंबेड बुद्रुक येथील प्रौढाचा मृत्यू
