रत्नागिरी : एमआयडीसीमधील सुप्रसिद्ध उद्योजक आणि सी फॅब्रिक्स कंपनीचे संस्थापक मालक राजेंद्र भालचंद काळे (वय 74) यांचे शनिवार, 26 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योजक व व्यावसायिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र काळे हे रत्नागिरीतील उद्योजकतेचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ होते. त्यांनी सी फॅब्रिक्स या कंपनीच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या दूरदृष्टी, प्रामाणिक कार्यपद्धती आणि कामगिरीच्या जोरावर त्यांनी उद्योजकांमध्ये आदराचे स्थान मिळवले. ते एक अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात असत. सर्वांशी मनमिळावूपणे वागत असल्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.
उद्योजक क्षेत्रात त्यांच्या योगदानाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे रत्नागिरीतील औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रत्नागिरी चर्मालय येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
स्थानिक उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली.
रत्नागिरी : प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र भालचंद काळे यांचे निधन
