रायगड : जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वेळे बागाड औद्योगिक वसाहत क्षेत्रामधील ट्युबक्राफ्ट प्रोसीजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील तब्बल ३३ लाख रुपयांच्या मशिनरीची चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा माणगाव (जि. रायगड) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून ३७.९० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबतची हकीकत अशी की, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी ट्यूबक्राफ्ट कंपनीचे शटर तोडण्यात येऊन अज्ञात चोरट्याने सुमारे 33 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापकांनी माणगाव पोलीस ठाण्यात गु. र. नं. 43/2025 भादंवि 2023 चे कलम 331(1)(2), 305(अ), 324(4)(5), 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान कंपनीच्या संमतीशिवाय शटर तोडून आत प्रवेश करण्यात आला होता. आरोपींनी कंपनीतील हाय-वेल्डिंग मशीन, ट्युलिंग मशीन, कॉपर व अल्युमिनियम वायर अशा लाखो रुपयांच्या वस्तूंची चोरी केली होती.
माणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस पथकाने तांत्रिक व शास्त्रीय पद्धतीने तपास केला आणि आरोपींचा शोध लावण्यात यश मिळवले. या टोळीने पूर्वनियोजित कट रचून चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी २३ जुलै २०२५ रोजी आरोपींना अटक केली. अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे :
1. मंगेश रविंद्र पवार (25), पाथरशेत, ता. रोहा, 2. विकास दत्ता पवार, दिघेवाडी, ता. सुधागड)
3. समीर भीम पवार,( काजुवाडी, ता. सुधागड)
4. दिनेश उर्फ बबलू बबन घोगरेकर, (पाथरशेत, ता. रोहा)
5. आकाश हरीशचंद्र पवार, (पाथरशेत, ता. रोहा)
6. चंद्रकांत इक्का जाधव (35), पाथरशेत, ता. माणगाव), पोलिसांनी आरोपींच्या तपास केल्यानंतरआरोपींच्या नावावर यापूर्वीही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे उघडकीस आले. आकाश पवार याच्यावर ३ वेगवेगळे गुन्हे नोंद असून त्यामध्ये हातापाय मारहाण, चोरी व कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप आहेत. मंगेश पवार याच्यावर महाराष्ट्र वनसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.दिनेश घोगरेकर याच्यावर देखील मारहाणीचे गंभीर गुन्हे आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवधरे, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी आणि माणगावचे प्रभारी पोलीस निरीक्षक निवृत्ती
बो-हाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. तपास पथकात सपोनि भेरु जाधव, बेलदार, पो. उपनिरीक्षक सुरेश घुगे आणि इतर पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.