GRAMIN SEARCH BANNER

लोटे औद्योगिक वसाहतीत बॉयलरच्या भीषण स्फोटात कामगाराचा मृत्यू

खेड : लोटे औद्योगिक वसाहतीमधील विनती ऑरगॅनिक कंपनीत आज (२६ जुलै) दुपारी साडे बाराच्या सुमारास भीषण अपघात झाला. बॉयलरचा एअर प्री-हिटर दाबामुळे अचानक फुटल्याने झालेल्या स्फोटात समीर कृष्णा खेडेकर या कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर खेडेकर हे स्फोटाच्या वेळी घटनास्थळी एकटेच कार्यरत होते. स्फोटात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. घटनेनंतर तातडीने त्यांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथ येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला.

या अपघाताची माहिती विनती ऑरगॅनिक कंपनीचे एचआर मॅनेजर सचिन खरे यांनी दिली असून, कंपनीमार्फत या घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी भेट देत पुढील तपास सुरू केला आहे.

घटनेच्या वेळी लोटे औद्योगिक उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत औद्योगिक अपघात, प्रदूषण आणि स्थानिक रोजगार यासंदर्भात बैठक सुरू होती. त्याच दरम्यान ही दुर्घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मृत समीर खेडेकर हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सुरेश कांबळे यांचे जावई होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे खेडेकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिकांतही हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2455994
Share This Article