GRAMIN SEARCH BANNER

लांजा : कोकणातील फणस बागेला ब्रिटनच्या गुंतवणूकदाराची भेट

Gramin Varta
462 Views

लांजा : तालुक्यातील झापडे गावातील हरिश्चंद्र देसाई यांच्या फणस बागेला युनायटेड किंग्डम, लंडन येथील नामांकित बिझनेसमन व इन्व्हेस्टर ग्रॅहम नोबेल व त्यांचा मुलगा यांनी नुकतीच भेट दिली. कोकणातील शेतमाल व त्याचे बाय-प्रॉडक्ट्स जागतिक बाजारपेठेत पोहोचावेत, यासाठी स्थानिक शेतकरी उत्पादक कंपनीसोबत कार्य करण्याचा निर्णय त्यांनी या भेटीत जाहीर केला.

युवा शेतकरी मिथिलेश देसाई, गौरव सोमवंशी व त्यांचा मित्र जोएल मायकेल (दुबई) हे गेल्या पंधरा महिन्यांपासून युनायटेड किंग्डम, इराण आणि दुबईतील व्यावसायिक भागीदारांशी सातत्यपूर्ण संपर्क साधत होते. अनेक सॅम्पल्स पाठवल्यानंतर प्रत्यक्ष पाहणीसाठी नोबेल यांची कोकणात येण्याची उत्सुकता वाढली.

ग्रॅहम नोबेल हे कृषी व व्हॅल्यू-ऍडेड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील इन्व्हेस्टर आहेत. त्यांच्या भेटीमुळे भारत, युनायटेड किंग्डम, दुबई आणि इराण यांदरम्यान कृषी व्यापार व नवनिर्मितीतील संबंध अधिक दृढ होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या वेळी फणस, काजू व आंबा उत्पादनांची व्हॅल्यू चेन, तंत्रज्ञानाचा वापर, ट्रेसेबिलिटी आणि निर्यातीच्या संधी यावर सखोल चर्चा झाली. “कोकणातील शेतमालाला तंत्रज्ञानाची जोड देऊन जागतिक बाजारपेठ मिळवून देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आमचा उद्देश आहे,” असे मिथिलेश देसाई यांनी सांगितले.

भविष्यात कोकणातील फणस, काजू, आंबा व त्यांच्या व्हॅल्यू-ऍडेड प्रॉडक्ट्सना आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitor Counter

3366895
Share This Article