राखी बांधून बहिणींनी मागितली ‘ओवाळणी’; चिपळूणच्या तरुणाईला नशेपासून वाचवा!

Gramin Varta
101 Views

चिपळूण : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडी आणि युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच चिपळूण शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराला आळा घालून तरुण पिढीला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कठोर आणि प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राखी बांधल्यानंतर महिला आघाडी आणि युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूण पोलीस उपविभागीय कार्यालयात जाऊन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांची भेट घेतली. शहरातील अंमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहाराबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून या गंभीर प्रश्नावर तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली.

चिपळूण शहरात विविध प्रकारच्या अंमली पदार्थांची खरेदी-विक्री आणि सेवन होत असल्याच्या बाबी निदर्शनास येत असून त्याचा सर्वाधिक परिणाम तरुण आणि विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. व्यसनाच्या वाढत्या प्रसारामुळे पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. व्यसनाधीनतेचा परिणाम तरुणांच्या शिक्षण, रोजगार आणि भवितव्यावर होण्याबरोबरच कुटुंबव्यवस्थेवरही होऊ शकतो. व्यसनासाठी पैशांची गरज भागविताना काही तरुण किरकोळ चोरी, मारामारी किंवा अन्य गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळण्याची शक्यता असल्याने हा प्रश्न केवळ वैयक्तिक व्यसनाचा नसून सामाजिक सुरक्षिततेशी संबंधित असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले.

अंमली पदार्थांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई न करता या संपूर्ण व्यवहाराच्या मुळापर्यंत जाण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. चिपळूणमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होतो, त्यामागील मुख्य पुरवठादार कोण आहेत, विक्रीचे जाळे कोण चालविते आणि या व्यवहारामागे संघटित टोळी किंवा मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास करण्याची मागणी करण्यात आली. अंमली पदार्थांच्या पुरवठ्यापासून विक्रीपर्यंतची संपूर्ण साखळी उघड करून मुख्य सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

शहरातील शाळा-महाविद्यालय परिसर, तरुणांची वर्दळ असलेली ठिकाणे, संवेदनशील भाग तसेच निर्जन ठिकाणी पोलिसांची गस्त आणि देखरेख वाढविण्याची मागणीही करण्यात आली. अंमली पदार्थांचा गैरव्यवहार रोखण्यासाठी गोपनीय माहिती संकलन, प्रभावी तपास, नियमित गस्त आणि जनजागृती यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बेले यांनी अंमली पदार्थांच्या गैरव्यवहारासंदर्भात पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईची माहिती दिली. चिपळूण शहरातील अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराचे जाळे आणि त्यामागील सूत्रधारांचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्यासाठी आवश्यक ती कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पुरवठा, विक्री आणि त्यामागील साखळीचा सखोल तपास करून या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन गंभीरपणे कार्यरत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महिला आघाडी शहर संघटक वैशाली शिंदे, युवतीसेना उपजिल्हा अधिकारी निशा बोभस्कर, युवती सेना तालुका अधिकारी तीर्था लाड, नगरसेविका वैशाली कदम, पंचायत समिती सदस्या सुप्रिया वंजारे, उपशहर संघटक फिरदोस कवारे, युवतीसेना विभाग अधिकारी मानसी चाळके, विभाग अधिकारी सेजल कदम, दामिनी दळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांच्या हातावर बांधलेली राखी ही केवळ सणाची परंपरा नसून विश्वास, संरक्षण आणि सामाजिक जबाबदारीचे प्रतीक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. चिपळूणच्या तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविण्यासाठी पोलिसांनी निर्णायक कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करत, “चिपळूणच्या तरुणाईला नशेपासून वाचवा, या विषारी व्यापाराच्या मुळापर्यंत जा आणि दोषींवर कठोर कारवाई करा. आज रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी म्हणून आम्ही पोलीस बांधवांकडे हीच ओवाळणी मागत आहोत,” असा संदेश महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Total Visitors :
4776723
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *