मंडणगड : खैराच्या तोडीसंदर्भात शासनाच्या निर्णयानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले खैर चोरीचे सत्र थांबायला तयार नाही. चोरट्यांनी आता थेट कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या एका महत्त्वाच्या व्यक्तीलाच लक्ष्य केल्याचे उघड झाले आहे. नुकत्याच समोर आलेल्या चोरीच्या घटनेत, खैर चोरट्यांनी तालुक्यातील मौजे आंबवणे खुर्द येथील ‘पोलीस पाटील’ किरण दीपक तांबे यांच्या मालकीचे ३० ते ३५ खैर परवानगीशिवाय चोरून नेले. स्वार्थासाठी व गैरकायदेशीररित्या ही चोरी करण्यात आली असून, या प्रकारामुळे तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.
पोलीस पाटलांसारख्या जबाबदार व्यक्तीच्या मालकीचेच खैर खुलेआम चोरले जात असल्याने, तालुक्यात खैर चोरांचा किती मोठा वावर आहे आणि त्यांना कायद्याचा किती धाक राहिला आहे, याबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही चोरी निदर्शनास आल्यानंतर पोलीस पाटील तांबे यांनी तत्काळ सागरी पोलीस ठाणे, बाणकोट येथे चोरीच्या घटनेची सविस्तर तक्रार दाखल केली आहे. शासनाच्या बदललेल्या नियमांनंतर खैराचे तोड व वाहतुकीबाबतची गुंतागुंत वाढल्याने चोरीचे प्रकार वाढल्याचे दिसत आहे. या चोरट्यांना वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे, अन्यथा खैर चोरीचे हे सत्र असेच सुरू राहील आणि पोलीस प्रशासनावरचा लोकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त होत आहे. पोलीस पाटील तांबे यांच्या तक्रारीनंतर आता पोलीस या खैर चोरांचा छडा लावण्यात यशस्वी होतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.