संदिप घाग / सावर्डे
कबड्डीच्या मैदानावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवणाऱ्या आणि 2014 साली दक्षिण कोरियातील इंचॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या सुप्रसिद्ध कबड्डीपटू नितीन मदने यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने तहसीलदार पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
खेळाच्या माध्यमातून प्रगतीचा मार्ग शोधत आपल्या कर्तृत्वाने नवा इतिहास घडवणाऱ्या नितीन मदने यांच्या या यशस्वी वाटचालीचा गौरव करण्यासाठी कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांनी विशेष सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी आमदार शेखर निकम म्हणाले, “क्रीडाक्षेत्रात घाम गाळून देशासाठी सुवर्णपदक जिंकणाऱ्या नितीन मदने यांनी आता प्रशासकीय क्षेत्रातही नवा अध्याय सुरू केला आहे. त्यांच्या या वाटचालीमुळे आजच्या तरुणांना प्रेरणा मिळेल.”
प्रो कबड्डी लीगमध्ये यू मुम्बा आणि बंगाल वॉरियर्स संघातून आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्या नितीन मदने यांना तहसीलदार पदावर नियुक्ती मिळाल्याने क्रीडा विश्वात आनंदाचे वातावरण आहे. आमदार शेखर निकम यांनी त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि उज्ज्वल भविष्याची कामना व्यक्त केली.
कबड्डीपटू नितीन मदने यांची तहसीलदार पदी नेमणूक; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सन्मान
