पालघर : किनारपट्टीवर कमी आसाच्या जाळ्यांचा वापर करून लहान पापलेट पिल्लांची बेकायदा मासेमारी मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. यामुळे राज्याच्या “राज्य मासा” म्हणून मान्यता असलेल्या पापलेटच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे.
मॉन्सूननंतर मिळणाऱ्या पापलेटची रुंदी सुमारे २० सेंमी आणि लांबी १० ते २९ सेंमी असते. त्यावेळी एका माशाचे वजन १५० ते २०० ग्रॅम असून बाजारात त्याला ८५० ते १३०० रुपये किलो दर मिळतो. मात्र, मार्च-मे दरम्यान ३० ते ५० ग्रॅम वजनाचे लहान पापलेट फक्त ७० रुपये किलो भावाने विकले जातात. तरीदेखील या पिल्लांची मासेमारी थांबलेली नाही. सध्या बाजारात १०० ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे पापलेट मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहेत. एका किलोमध्ये जवळपास ५० नग पापलेट विकले जात असून, त्यामुळे मोठे व विक्रीयोग्य पापलेट मिळणे जवळपास अशक्य झाले आहे. राज्य सरकारने पापलेटला “राज्य मासा” म्हणून विशेष दर्जा दिला असूनही, बेकायदा मासेमारी सुरूच आहे. ठाणे-पालघर मत्स्यव्यवसाय विभागाने बंदरांवर परवाना अधिकार्यांमार्फत पाहणी सुरू केली आहे. लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या बोटीवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच मत्स्य सहकारी संस्था आणि किनारी गावांमध्ये बैठका घेऊन जनजागृती मोहीम राबवली जात आहे. “लहान पिल्लांची मासेमारी थांबवली नाही तर पापलेटसारखा मौल्यवान मासा नामशेष होण्याचा धोका निर्माण होईल. त्यामुळे मच्छीमारांनीही जबाबदारीने वागून मासेमारीतील शिस्त पाळावी,” असे दिनेश पाटील, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय विभाग यांनी स्पष्ट केले.
पालघरमध्ये पापलेट माशांचे उत्पादन धोक्यात !
