GRAMIN SEARCH BANNER

रामआळी येथे बेदम मारहाण प्रकरणी वायंगणी येथील तरुणावर गुन्हा ; 2 दिवसांची पोलिस कोठडी

Gramin Varta
573 Views

रत्नागिरी : शहरातील रामआळी येथील जनता सहकारी बँकेच्या एटीएम जवळील मोकळ्या जागेत झोपलेल्या एका मजुराला स्टील पाईपने डोक्यात मारून गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात वायंगणी येथील स्वप्निल सुनील पाटील याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश यशवंत भारती (वय ४५, रा. तोनदे, मराठवाडी) हे रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास रामआळी येथील एटीएम समोरील मोकळ्या जागेत झोपले होते. यावेळी संशयित आरोपी स्वप्निल सुनील पाटील (वय ४२, रा. वायंगणी) याने भारती यांना झोपेतून उठवून ‘तू येथून निघून जा’ असे सांगितले. यावर फिर्यादी मंगेश भारती यांनी ‘तू मला सांगणारा कोण?’ असे विचारल्याचा राग मनात धरून स्वप्निल पाटील याने त्यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान हाणामारीत होऊन संशयिताने भारती यांना हाताने आणि थापटाने मारहाण केली. त्यानंतर जवळच असलेला स्टीलचा पाईप घेऊन भारती यांच्या डोक्यात जोराने प्रहार केला. या हल्ल्यात भारती यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर जखमी मंगेश भारती यांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच रविवारी दुपारी ३:१९ वाजता पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्निल पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(२), ११५(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०६/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3199472
Share This Article