जैतापूर/ राजन लाड: आज सकाळी जैतापूरजवळील सागरी महामार्गावरील उतारावर एक मालवाहू टँकर अचानक बंद पडल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे मोठ्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सुदैवाने, लहान चारचाकी वाहनांना मात्र मार्ग काढता येत असल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.
सद्यस्थितीत, पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
टँकर हटवण्यासाठी क्रेन आणि जेसीबी मागवण्यात आले असून, लवकरच टँकर बाजूला करण्याचे काम सुरू होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी पूर्ववत होण्यास दुपारचे बारा वाजेपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आले आहेत: रत्नागिरीहून देवगडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी धाऊलवली फाटा येथून जाकादेवी मार्गे जैतापूरकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जैतापूर पुलावरून येणाऱ्या वाहनांसाठी धाऊलवलीमार्गे जाकादेवी आणि धारतळे मार्गे रत्नागिरीकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.
वाहतूक पूर्ववत होईपर्यंत वाहनचालकांनी संयम राखावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रवास करताना प्रवाशांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.