अन्यायाविरोधात १४ पासून आमरण उपोषणाचा इशारा
चिपळूण (प्रतिनिधी): गाणे-खडपोली एम.आय.डी.सी. परिसरातील साफ ईस्टकंपनी प्रा. लि. येथील तब्बल २४० कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करण्यात आल्याच्या निषेधार्थ कामगार वर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आवाज उठवत दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
कामगारांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, ते सर्व खडपोली, गाणे, वालोटी, कळकवणे, तसेच आसपासच्या गावांतील रहिवासी असून काहीजणांनी या कंपनीत तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ सेवा दिली आहे. मात्र, दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे कामगारांना कामावरून कमी केले.
या पार्श्वभूमीवर दि. २७ सप्टेंबर रोजी आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत कंपनी व्यवस्थापन, प्रशासकीय अधिकारी व कामगार प्रतिनिधींची बैठक झाली होती. या बैठकीत व्यवस्थापनाच्यावतीने श्री. आंबेकर यांनी आमदार शेखर निकम यांच्या मध्यस्थीने “कामगारांना टप्याटप्याने पुन्हा कामावर घेतले जाईल” असे आश्वासन दिले होते.
परंतु प्रत्यक्षात केवळ १३० कामगारांनाच कामावर घेतले गेले, तर उर्वरित कामगारांना आजतागायत कामावर घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे, तर कामावर परतलेल्या कामगारांनाही अपमानकारक वागणूक दिली जात असून दोन कामगारांचे काम एका व्यक्तीकडून करवून घेतले जात आहे, अशी तक्रार करण्यात आली आहे.
कामगारांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, कंपनी व्यवस्थापनाने “कच्चा मालाचा तुटवडा असल्याचे खोटे कारण देऊन कामगारांना कमी केले आणि बाहेरील व्यक्तींना कामावर घेतले.” यामुळे स्थानिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून सणासुदीच्या काळात त्यांचे कुटुंबीय अडचणीत सापडले आहेत.
या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी सर्व कामगारांनी दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या कुटुंबीयांसह कंपनीसमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.
कामगारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री आकाश फुंडकर, पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, आमदार शेखर निकम, तसेच कामगार विभाग, तहसिलदार, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे याबाबत निवेदन पाठविले आहे.
कामगारांचे म्हणणे आहे की, “आम्हाला कोणताही संघर्ष नको, फक्त न्याय हवा. आम्हाला पुन्हा कामावर घेण्यात यावे, अन्यथा आम्ही आमच्या कुटुंबीयांसहित उपोषण करणार आहोत.”
या प्रकरणामुळे गाणे-खडपोली औद्योगिक क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन व कामगार विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
या वेळी निलेश गजमल, शिवाजी गुरव, गणेश गजमल, दीपक जाधव, रोशन राणे, विक्रम घाग, संतोष खरात, आदेश सुतार, संकेत सुर्वे, संदेश जोंधळे, निलेश शिर्के यांच्यासह १२०हून अधिक कामगार उपस्थित होते.
या वेळी बोलताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी कंपनी स्थानिक कामगारांवर अन्याय करत असेल, तर आपण ते खपवून घेणार नाही. १३० कामगारांना घेऊन उर्वरित कामगारांना पाच दिवसात घेतो, असा शब्द कंपनी प्रशासनाने आमदार शेखर निकम यांना दिला होता. १३ ऑक्टोबरपर्यंत निर्णय झाला नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशारा त्यांनी दिला. एडवोकेट अमित कदम यांनीही आम्ही कामगारांच्या बाजूने आहोत. कंपनी यापूर्वीही मजूरपणे वागत होती, मात्र आम्ही स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन शांत होतो, असे त्यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादा साळवी व अन्य उपस्थित होते.
चिपळूण: साफईस्ट कंपनीतील कामगारांना अचानकपणे कामावरून केले कमी
