कुडाळ: कुडाळ कुंभारवाडी येथून तीन महिन्यांपूर्वी चोरी झालेल्या दुचाकीचा छडा लावण्यात कुडाळ पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अनुज रमेश कावनकर (वय २५, रा. भोपण पंदेरी, दापोली, जि. रत्नागिरी) याला चोरीच्या दुचाकीसह नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथील एका मेडिकल कंपनीतून ताब्यात घेतले. कुडाळ न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलीस ठाण्यात ३ मार्च २०२५ रोजी गुन्हा क्र. ००५२/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार, फिर्यादी साईशिल्प गुरुदेव मांद्रेकर (वय २७, शिल्पकार, रा. वरची कुंभारवाडी, कुडाळ) यांच्या ताब्यातील आणि साक्षीदार संजय बाबू कुंभार यांच्या मालकीची टीव्हीएस एन्टोर १२५ दुचाकी (क्र. एम.एच.०७ एक्यु. ८९२३) १ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत आरोपी अनुज रमेश कावनकर याने फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार एम.एल. शिंगाडे यांच्याकडे सोपवण्यात आला होता.
गुन्ह्याच्या तपासात, फिर्यादी आणि साक्षीदारांकडून आरोपीच्या ठिकाणाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. आरोपी अनुज कावनकरकडे पूर्वी मोबाईल क्र. ८४१२०५३७२५ होता, परंतु दुचाकी चोरल्यापासून त्याचा हा मोबाईल बंद होता, त्यामुळे त्याचे लोकेशन मिळत नव्हते. मात्र, तपासी अंमलदार एम.एल. शिंगाडे यांनी वारंवार त्याच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरवर सायबर सेलमार्फत लक्ष ठेवले होते. २१ जून २०२५ रोजी, तब्बल तीन महिन्यांनंतर, आरोपीने त्याच्या जुन्या मोबाईलमध्ये क्र. ९२७२११४७६२ हे सिमकार्ड काही काळासाठी टाकून वापरले. यामुळे तात्काळ आरोपीचे लोकेशन प्राप्त झाले.
त्यानंतर तात्काळ आरोपीचा मोबाईल लोकेशनप्रमाणे शोध घेण्यासाठी तपासी अंमलदार पोलीस हवालदार एम.एल. शिंगाडे आणि पोलीस नाईक एफ.बी. बुथेलो यांना पोलीस अधीक्षकांच्या पूर्वपरवानगीने २३ जून २०२५ रोजी तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे पाठविण्यात आले.
सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक डॉ. श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक, कुडाळ राजेंद्र मगदुम यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे या पोलीस पथकाने २४ जून २०२५ रोजी तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे हजर राहून स्थानिक अंमलदारांच्या मदतीने आरोपी अनुज रमेश कावनकरचा तुर्भे एमआयडीसीमध्ये शोध सुरू केला. आरोपीचे मोबाईल लोकेशन ‘सी’ टाईप (२०० मीटर औरस चौरस एरिया) असल्याने त्याचा नक्की ठावठिकाणा मिळून येत नव्हता. परंतु, तपासी अंमलदार व त्यांच्या पथकाने चिकाटीने आजूबाजूच्या परिसरातील सर्व फॅक्टरींमध्ये शोध घेतला. २४ जून २०२५ रोजी सायंकाळी एका मेडिकल कंपनीत आरोपी चोरीच्या दुचाकीसह मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कुडाळ न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याला जिल्हा कारागृह, सावंतवाडी येथे जमा करण्यात आले आहे.
या उघडकीस न आलेल्या प्रलंबित गुन्ह्यातील आरोपीस अटक करून गुन्ह्यातील ४०,०००/- रुपये किमतीची टीव्हीएस एन्टोर १२५ गाडी हस्तगत करून चांगली कामगिरी केल्याबद्दल तपासी अंमलदार पोलीस हवालदार एम.एल. शिंगाडे आणि पोलीस नाईक एफ.बी. बुथेलो यांचे पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग डॉ. श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे आणि पोलीस निरीक्षक, कुडाळ राजेंद्र मगदुम यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, पोलीस निरीक्षक, कुडाळ राजेंद्र मगदुम यांनी या पथकाला रोख १,०००/- रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले आहे.