राजन लाड/जैतापूर: महाराष्ट्र पोलीस दलातील एक आदर्श अधिकारी आणि कर्तव्यपरायण व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) यशवंत रघुनाथ केडगे हे उद्या, ३० जून २०२५ रोजी वयोमानानुसार आपल्या ३७ वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रेरणादायी पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या या गौरवशाली कारकिर्दीला पोलीस दलासह विविध क्षेत्रांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
१९८८ सालच्या बॅचचे अधिकारी असलेल्या केडगे यांनी आपल्या ३७ वर्षांच्या सेवेत असंख्य महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या पोलीस सेवेची सुरुवात नागपूर येथे PSI पदावरून झाली. त्यानंतर पुणे लोहमार्ग, विशेष सुरक्षा विभाग आणि पुणे शहर येथे त्यांनी अपार मेहनतीने विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. २००७ साली त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आणि त्यांनी कोल्हापूर, सातारा तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे काम केले. सोलापूर शहरातही त्यांनी आपली सेवा दिली.
२०१९ साली त्यांना DYSP म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी वाशिम जिल्ह्यात चार वर्षे कार्यरत राहून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यानंतर त्यांची रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी गुन्हे उकलण्यात, सामाजिक भान जपण्यात आणि पोलीस प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात मोलाचे योगदान दिले.
त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गुन्ह्यांची यशस्वीरित्या उकल झाली आहे. बॉक्सिंग या खेळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांना पोलीस खात्यातून अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पोलीस प्रशिक्षण केंद्रात त्यांना ‘बेस्ट टीचर’ म्हणून गौरवण्यात आले होते. महिलांसाठी तसेच युवकांसाठी ई-लर्निंग प्रशिक्षण उपक्रम राबवून त्यांनी तंत्रस्नेही पोलीस यंत्रणेला चालना दिली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशानुसार, त्यांचा सहभाग असलेल्या अनेक महत्त्वाच्या गुन्हे उकल प्रकरणांनी राज्यात आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या नेतृत्वात ठाणे जिल्ह्यातील दर्शन शाह हत्या प्रकरण यशस्वीरित्या उकलण्यात आले. आजरा येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये असलेला वाद मिटवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यामुळे महात्मा गांधी तंटामुक्त अभियानांतर्गत आजरा तालुका महाराष्ट्रात पहिला शंभर टक्के तंटामुक्त तालुका म्हणून जाहीर झाला होता. तसेच, राज लान्सर बस दरोडा प्रकरणात त्यांनी १२ आरोपींना अटक करून सुमारे एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. २०११ मध्ये कोल्हापूर येथे २८ बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करत, तीन महिन्यांच्या तुरुंगवासानंतर त्यांना बांगलादेशात पाठवण्याच्या कार्यातही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांच्यासमवेतही त्यांनी काम केले असून, निकम साहेबांनीही केडगे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
यशवंत केडगे यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना केवळ एक अधिकारी म्हणूनच नव्हे, तर एक सामाजिक भान असलेला नेता म्हणूनही ओळख मिळाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे पोलीस दलात एक मोठी पोकळी निर्माण होणार आहे. “यशवंत केडगे” हे नाव राज्यातील पोलीस यंत्रणेत प्रामाणिक, मेहनती, सजग आणि लोकाभिमुख अधिकाऱ्याचे प्रतीक ठरले आहे. त्यांच्या या प्रदीर्घ आणि यशस्वी पोलीस सेवेबद्दल पोलीस दलासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.