रत्नागिरी: शहरातील डांबरी रस्त्यांची झालेली दुर्दशा, ठेकेदारांची दिरंगाई आणि नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती व्हावी, अशी अपेक्षा असतानाही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष रत्नागिरी शहरतर्फे रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले. रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देताना माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले, माजी नगरसेवक बबन आंबेकर, सरचिटणीस रणजित शिर्के, मनोहर गुरव उपस्थित होते.
शहरातील गणपती मंदिर, मुरलीधर मंदिर, बंदर रोड, भुते नाका, मांडवी ते घुडेवठार, जयस्तंभ, भाट्ये पूल, सन्मित्रनगर, राम माळी, मारुतीची आळी, बस स्टँड परिसर, किल्ला भागेश्वर मंदिर ते राजवाडी भगवती बंदर या भागांतील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार अपघाताला सामोरे जात असून, पादचाऱ्यांसाठीही सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
माजी नगरसेवकांनी यापूर्वीही वेळोवेळी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत चालली आहे. रस्त्यांवरील खड्डे ही फक्त गैरसोयीची बाब न राहता आता ती जीवघेणी ठरत असल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
शहरातील सणासुदीच्या काळात नागरिकांना या त्रासातून दिलासा मिळावा, तसेच अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
रत्नागिरीतील खड्डेमय रस्त्यांवरून संतप्त नागरिकांची तक्रार; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तातडीने डागडुजीची मागणी
