चिपळूण: “जन्माजन्माची साथ” या वचनाला खरे करत, चिपळूण तालुक्यातील निवळी येथे एका वृद्ध दाम्पत्याने एकाच दिवशी जगाचा निरोप घेतल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मनोहर श्रीपतराव सुर्वे (९१) आणि त्यांच्या पत्नी संगीता मनोहर सुर्वे (८१) अशी या दाम्पत्याची नावे असून, त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांच्यावर सोमवारी चिपळुणातील रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर सुर्वे हे रिझर्व्ह बँकेतून सेवानिवृत्त झाले होते, तर संगीता सुर्वे या गृहिणी होत्या. आयुष्यभर एकमेकांना साथ देणाऱ्या या दाम्पत्याने, आपले निधन झाल्यावर अंतिम विधी चिपळुणातील रामतीर्थ स्मशानभूमीतच व्हावेत अशी इच्छा पूर्वीच व्यक्त केली होती.
गेले काही दिवस मनोहर सुर्वे हे आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. याच उपचारादरम्यान त्यांचे रविवारी निधन झाले. पतीच्या निधनाची बातमी कळताच, त्यांच्या पत्नी संगीता यांनीही काही मिनिटांतच जगाचा निरोप घेतला. ही बातमी ऐकून कुटुंबीय आणि नातेवाईकांना मोठा धक्का बसला.
या दाम्पत्याच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत चर्चा सुरू असताना, मुलांनी आणि नातेवाईकांनी सुर्वे दाम्पत्याची अंतिम इच्छा सर्वांना सांगितली. त्यानुसार, कुटुंबीयांनी दोघांवरही शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी वैकुंठरथातून दोघांचेही मृतदेह रामतीर्थ स्मशानभूमीत आणण्यात आले आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुर्वे दाम्पत्याच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देणाऱ्या या दाम्पत्याच्या निधनाने निवळी गावात आणि चिपळूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.