येणाऱ्या निवडणुकीत मतदार मतदान न करण्याच्या विचारात
रत्नागिरी : शहरालगत असलेल्या उद्यमनगर पटवर्धनवाडी येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले आहेत. मुसळधार पावसात या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. वाहन चालकांना विशेष करून महिला वाहन चालकांना या रस्त्यावरून वाहन चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी नगर परिषद आणि शिरगाव ग्रामपंचायत दोघांमध्ये हद्दीवरून सुसंवाद नसल्याचा मोठा फटका या भागातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वारंवार तक्रार करूनही रस्ता होत नसल्याने यापुढे कुठल्याही निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय इथल्या लोकांनी घेतला आहे.
पावसाळ्या पूर्वी या रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र पावसाळा जाण्याच्या मार्गावर असून देखील नगर परिषद किंवा शिरगाव ग्रामपंचायती याकडे कानाडोला करत आहे. खरोखरच हा रस्ता कोणाच्या हद्दीत येतो शिरगाव ग्रामपंचायत की नगरपरिषद? या प्रश्नाचे उत्तर अजून पर्यंत मिळालेले नसल्याने लोकांची मोठी अडचण होत आहे. याचा फटका नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. मतदान न करण्याच्या विचारात आहेत.
या भागातील काही लोक स्वतःला लोकप्रतिनिधी समजणारे या रस्त्याकडे फिरकूनही बघत नसल्याने लोकांचा पारा चढला आहे. येत्या निवडणुकीत या भागातील लोक नक्कीच त्यांना त्याचा रस्ता दाखवतील असे बोलले जात आहे.