लांजा : कोत्रेवाडी येथील घनकचरा प्रकल्पाविरोधात गेल्या ३८ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी लांजा नगरपंचायत कार्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. दुपारी ४ वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री ८.३० वाजेपर्यंत चालली. मात्र या बैठकीत प्रशासन आणि कोत्रेवाडी नागरिक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.
ग्रामस्थांनी पुन्हा एकदा ठामपणे आपली भूमिका मांडत घनकचरा प्रकल्प कोत्रेवाडी येथे कदापि मंजूर करणार नाही, तो प्रकल्प तातडीने रद्दच व्हावा अशी मागणी सातत्याने करत आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यानंतर बैठकीत नागरिकांची घनकचरा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीचे पत्र लांजा मुख्याधिकारींच्यावतीने प्रधान सचिव, नगरविकास विभाग, मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात आले.
या महत्त्वपूर्ण चर्चासत्राला जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे आदी अधिकारी उपस्थित होते. नागरिकांच्या ठाम भूमिकेमुळे प्रकल्पासंदर्भातील तोडगा काढण्याची जबाबदारी पुन्हा एकदा प्रशासनावर आली आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले की तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही, जोपर्यंत शासन स्तरावरून घनकचरा प्रकल्प रद्द करण्याचा स्पष्ट आदेश मिळत नाही. त्यामुळे नागरिकांच्या उपोषणाला आज ३८ दिवस पूर्ण होत असून पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते याकडे लागले आहे. तर यावेळी कोत्रेवाडी नागरिकांच्यावतीने अशोकराव जाधव आणि मंगेश आंबेकर यांनी मांडली.
लांजा प्रशासन – कोत्रेवाडी नागरिकांमध्ये घनकचरा प्रकल्पावरून जोरदार खडाजंगी
