लांजा : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. शिवसेना कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.
या निवडणुका आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जाणार असून तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर महायुतीला यश मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद गटांसाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये गवाणे गटातून संतोष रेवाळे, आसगे गटातून सौ. मनीषा लाखण, भांबेड गटातून सौ. विनिता गांगण तर साटवली गटातून सौ. लीला घडशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तालुक्यातील पंचायत समितीच्या एकूण आठ जागांपैकी सात जागा शिवसेनेकडून लढविल्या जाणार असून एक जागा भाजपसाठी सोडण्यात आली आहे. आसगे गणासाठी सौ. मानसी आंबेकर, वेरवली गणासाठी सौ. साक्षी चव्हाण, गवाणे गणासाठी सौ. दिपाली साळवी, खानवली गणासाठी यशवंत वाकडे, प्रभानवल्ली गणासाठी उमेश पत्की, साटवली गणासाठी आदेश आंबोळकर आणि वाकेड गणासाठी रसिका मेस्त्री यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भांबेड पंचायत समितीची जागा भाजपकडे देण्यात आली असून त्या ठिकाणी भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर हे उमेदवार असतील.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश खामकर, शिवसेनेचे प्रचारप्रमुख प्रसन्न शेट्ये, भाजपा जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, भाजपा तालुकाध्यक्ष विराज हरमले, शिवसेना युवा तालुका अधिकारी राजू धावणे यांच्यासह महायुतीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.







