GRAMIN SEARCH BANNER

गणेशोत्सवासाठी कोकणात धावणार अधिक विशेष रेल्वे गाड्या; खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश

रत्नागिरी : आगामी गणेश चतुर्थीनिमित्त कोकणात आपल्या मुळगावी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी दिलासादायक बातमी आहे. माजी केंद्रीय मंत्री व रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, यंदा गतवर्षीपेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या कोकणासाठी धावणार आहेत.

खासदार राणे यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन, गणेशोत्सव काळात कोकणात होणाऱ्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री वैष्णव यांनी भाविकांसाठी अधिक गाड्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

गेल्या वर्षी भारतीय रेल्वेने ३४२ विशेष गाड्या सोडून उत्तम प्रतिसाद मिळवला होता. यंदा ही संख्या वाढवून प्रवाशांचा अनुभव आणखी सुलभ करण्यासाठी राणे यांनी काही महत्त्वाच्या मागण्या केल्या.
त्यामध्ये:

मुंबई, पुणे येथून चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आदी स्थानकांशी अधिक गाड्या जोडाव्यात,

गाड्यांची घोषणा वेळेवर करून आरक्षण लवकर सुरू करावे,

स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडावेत,

कोकणातील विविध ठिकाणांपर्यंत गाड्यांचे मार्ग वाढवावेत,


यामुळे प्रवास सुलभ होऊन गर्दी नियंत्रणात राहील आणि गणेशोत्सव शांततेत पार पडेल, असे राणे यांनी नमूद केले.

या बैठकीदरम्यान, रेल्वे मंत्री वैष्णव यांनी प्रवाशांना तिकीट बुकिंगसंदर्भात कोणतीही अडचण येणार नाही याची ग्वाही दिली. तसेच, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाला दिले.

कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक जिव्हाळ्याचा विषय असून, या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2455917
Share This Article