मुलींनी लुटला पारंपरिक खेळांचा आनंद, झिम्मा – फुगड्यांनी आणली बहार
संगमेश्वर : शाळेत केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांना संस्कृती रक्षणाचे शिक्षण आणि माहिती देणं सध्याच्या काळात खूप गरजेचे बनले आहे. अभ्यासाबरोबरच सामान्य ज्ञानातही विद्यार्थी चौकस बनावे यासाठी शाळांकडून विशेष प्रयत्न केले जातात. याचाच एक भाग म्हणून व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरने आज आगळावेगळा आनंददायी श्रावण शनिवार साजरा करुन मुलांना श्रावणातील प्रथा परंपरांनी अवगत केले. झिम्मा, फुगड्या, टीपऱ्या, मंगळागौर यासारख्या विविध प्राचीन आणि पारंपारिक खेळांचे प्रशालेतील मुलींनी उत्तम पध्दतीने सादरीकरण करत उपस्थित सर्वांची वाहवा आणि शाब्बासकी मिळवली.
व्यापारी पैसा फंड संस्था संचलीत पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर नेहमीच विविध स्तरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवत असते. कला, वक्तृत्व, क्रिडा अशा विविध स्तरावर नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या विद्यालयाने आता सांस्कृतिक क्षेत्रातही वेगळी वाट चालण्याच्या हेतूने नवनवीन उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून आज प्रशालेत ‘ श्रावणधारा ‘ या श्रावण महिन्याचे सांस्कृतिक महत्व पटवून देणाऱ्या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्था सचिव धनंजय शेट्ये यांनी उदघाटना दरम्यान श्रावण महिन्यातील स्त्रीयांच्या विविध खेळांचा उद्देश आणि या खेळांचे महत्व विषद केले. बदलत्या काळात या प्रथा परंपरा कमी होत असल्याने शाळेतील मुलींना याची बालपणीच ओळख व्हावी, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनीनी श्रावणधारा कार्यक्रमात झिम्मा, फुगडी, टीपरी नृत्य, गोफ विणणे, बसफुगडी, मंगळागौरीतील अन्य खेळ तसेच उदबोधनपर कार्यक्रम सादर करुन स्वतःमधील कलांचे उत्तम प्रदर्शन केले. मुलींनी सादर केलेल्या श्रावणातील खेळांतून संस्कृतीचे उत्तम दर्शन तर झालेच शिवाय या परंपरा पुढे चालविण्याचा वसाही मुलींना घेता आला. प्रशालेच्या सर्व वर्गातील सुमारे २५० मुलींनी श्रावणधारा कार्यक्रमात भाग घेऊन स्वतः मधील कलाविष्कार सादर केला. अशा कार्यक्रमांचे प्रशालेत दरवर्षी आयोजन करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी प्रशालेतील महिला शिक्षिकांसह सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले.
संस्कृती अभ्यास आणि जतनासाठी श्रावणधारा कार्यक्रमाचे पैसा फंड प्रशालेत आयोजन !
