GRAMIN SEARCH BANNER

लांजातील डंपिंग ग्राउंडची जागा स्थलांतरित करा : आमदार किरण सामंत

लांजा : कोणाचेही नुकसान न करता नागरिकांच्या हरकती लक्षात घेऊन आणि सर्वांना विश्वासात घेऊनच विकास आराखड्यात अत्यावश्यक बदल केले जातील असे आश्वासन आमदार किरण सामंत यांनी कुवे ग्रामस्थांना दिले असून कुवे येथील डम्पिंग ग्राऊंडची जागेवर जाऊन पाहणी करत मुख्याधिकारींना १५ दिवसात जागा स्थलांतरीत करण्याची सूचना यावेळी आमदार सामंत यांनी दिली.

कुवे ग्रामस्थांनी नुकतीच आमदार किरण सामंत यांची भेट घेतली, यावेळी आमदार सामंत यांनी आश्वासन दिले. शहर विकास आराखड्याबाबत समस्या, कुवे येथील डम्पिंग ग्राऊंड व नगरपंचायत कार्यक्षेत्रात मृत्यू दाखल्याकरिता वैद्यकीय अधिकारी यांचे आवश्यक असणारे वैद्यकीय प्रमाणपत्र अट रद्द करण्यात यावी अशा मागणी संदर्भात आमदार किरण सामंत यांची भेट घेत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या भेटीवेळी कुवे ग्रामस्थांच्यावतीने आमदार सामंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हंटले आहे की, कुवे येथील महामार्गावर असणारे डंपिंग गेली दोन वर्षे सुरू आहे. सदर डंपिंग ग्राऊंडच्या आजूबाजूला लोकवस्ती व लोकांचा मोठ्याप्रमाणात वावर आहे. आम्ही वारंवार मागणी करून देखील काही कार्यवाही होत नाही. त्यामुळे आपण लक्ष घालून डम्पिंग ग्राउंड त्वरीत स्थलांतरीत करावे. तसेच लांजा ग्रामपंचायत व कुवे ग्रामपंचायत मिळून लांजा नगरपंचायत स्थापन झाली. परंतु स्थापन होताना लांजा-कुवे न होता फक्त लांजा नगरपंचायत असे नामकरण करण्यात आले. आपण आपल्या स्तरावर कार्यवाही करून लांजा-कुवे असे नामकरण करण्यात यावे. त्याचप्रमाणे लांजा-कुवे नगरपंचायत कार्य क्षेत्रात मृत्यू दाखला नोंदणी करण्याकरिता सर्व मृत्यू नोंदी करिता वैद्यकीय प्रमाणपत्र अत्यावश्यक केलेले आहे. अपघाती किंवा दवाखान्यात मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणे शक्य होते. परंतु नैसर्गिक किंवा व वृद्धापकाळाने झालेल्या मृत्यूचे प्रमाणापत्र मिळविणे जिकरीचे होते. त्यामुळे नैसर्गिकरित्या झालेल्या मृत्यू दाखला नोंदणीकरिता संबंधित नगरसेवक किंवा पोलीस पाटील यांचा दाखला ग्राह्य धरण्यात यावा, अशा मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना कुवे येथील माजी नगरसेवक सचिन डोंगरकर यांच्यासह इतर कुवे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

लांजा नगरपंचायतीच्या शहर विकास आराखड्याला कुवे येथील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला होता. हा विकास आराखडा तात्काळ रद्द करण्याची मागणी कुवे येथील ग्रामस्थांनी मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच लांजा नगरपंचायतीच्या वतीने शहर प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात असणाऱ्या नागरिकांच्या शंका, अडीअडचणीचे निरसन करण्यासाठी नगरपंचायतीच्यावतीने  २६ एप्रिल रोजी लांजा शहरातील आग्रे हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुवे येथील ग्रामस्थांनी हा विकास आराखडा रद्द करण्यात यावा अशी जोरदार मागणी केली. मात्र त्यावेळी आमदार किरण सामंत यांनी कोणत्याही परिस्थितीत विकास आराखडा हा रद्द होणार नाही, येणाऱ्या हरकतीवर मार्ग काढून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले होते.

या पार्श्वभूमीवर कुवे येथील ग्रामस्थांनी आमदार सामंत यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. त्यावर आमदार सामंत यांनी स्पष्टपणे सांगितले की, विकास आराखडा पूर्णत्वास नेताना कोणावरही अन्याय केला जाणार नाही. सर्वांच्या हरकती लक्षात घेऊन आणि जनतेला विश्वासात घेऊनच विकास आराखड्या संदर्भात निर्णय घेतले जातील. सर्वसामान्य जनेतचे नुकसान करून हा विकास आराखडा करण्यात येणार नाही, सर्वांचा योग्य तो न्याय दिला जाईल असे आश्वासन यावेळी आमदार सामंत यांनी कुवे ग्रामस्थांनी दिले. दरम्यान यावेळी चर्चे दरम्यान शासकीय अधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे नागरिकांनी आपले विविध प्रश्न अधिकाऱ्यांसमोर उपस्थित केल्यानंतर अधिकारींनी त्यांच्या शंकाचे निरसन केले. तसेच आमदार किरण सामंत यांनी कुवे येथील डम्पिंग ग्राऊंडची जागेवर जाऊन पाहणी करत मुख्याधिकारी तुषार बाबर यांना सदर जागा १५ दिवसांत स्थलांतरीत करण्यात यावी अशी सूचना करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत कुवे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, यावेळी बैठकीला मुख्याधिकारी तुषार बाबर, शिवसेना विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुनिल (राजू) कुरूप, तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, बाबा भिंगार्डे, मुन्ना खामकर,  प्रसाद भाईशेट्ये, बाबा लांजेकर आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Total Visitor

0217952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *