GRAMIN SEARCH BANNER

‘पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठेचं कर्करोगाने निधन

Gramin Varta
36 Views

मुंबई: ‘पवित्र रिश्ता’, ‘साथ निभाना साथियाँ’, ‘तुझेच मी गीत गात आहे’ यांसारख्या हिंदी आणि मराठी मालिकांमधून आपल्या दमदार अभिनयकौशल्याची छाप सोडणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं आहे.

वयाच्या 38 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला आहे. आज (रविवार) पहाटे चार वाजता कर्करोगाने प्रियाचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षभरापासून प्रिया लाइमलाइटपासून दूरच होती. सोशल मीडियावरही ती सक्रिय नव्हती. अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रिया शेवटची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. परंतु ही मालिकासुद्धा तिने मधेच सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिने याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिने आरोग्याचं कारण दिलं होतं.

“आरोग्याच्या कारणास्तव मी ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा निरोप घेत आहे. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचं शेड्युल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होतंय. माझ्या आरोग्याची समस्याही अचानकच उद्भवली आहे. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे”, असं तिने या व्हिडीओत म्हटलं होतं.


प्रियाने ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या. ‘चार दिवस सासूचे’मध्येही ती झळकली होती. त्यानंतर ‘कसम से’ या मालिकेतून तिने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत तिने वर्षाची भूमिका साकारली होती. ‘बडे अच्छे लगते है’ या गाजलेल्या मालिकेत ती ज्योती मल्होत्राच्या भूमिकेत होती. प्रिया मराठेनं 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघेशी लग्न केलं होतं.

छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये प्रिया मराठे घराघरात पोहोचली होती. प्रेक्षकांच्या मनात तिने अढळ स्थान निर्माण केलं होतं. भूमिका नकारात्मक असली तरी त्यातूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.

Total Visitor Counter

2651762
Share This Article