GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : शिरगाव येथील दाम्पत्याचा कोल्हापुरात प्रताप, भिशीच्या नावाखाली 38 महिलांना 25 लाखांचा गंडा

Gramin Varta
745 Views

रत्नागिरी : खासगी भिशी चालवणाऱ्या एका दाम्पत्याने कोल्हापुरातील ३८ हून अधिक सभासदांना २५ लाख रुपयांना गंडा घालून गाशा गुंडाळल्याची घटना समोर आली आहे. राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी परिसरात ही फसवणूक झाली असून, भिकाजी पंडित शिंदे व प्राजक्ता भिकाजी शिंदे (रा. राजेंद्रनगर, म्हाडा कॉलनी, सध्या, आडी शिरगाव, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत.

महिलांची फसवणूक करून हे पळून गेल्याची माहिती आहे. याप्रकरणी राजेंद्र आप्पासाहेब थोरवत यांच्यासह फसवणूक झालेल्या ३८ सभासदांनी शनिवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिकाजी शिंदे हा राजेंद्रनगर येथील म्हाडा कॉलनीचा चेअरमन असल्याने त्याची परिसरातील नागरिकांशी चांगली ओळख होती. याच ओळखीचा फायदा घेत शिंदे दाम्पत्याने २०२० मध्ये खासगी मासिक भिशी सुरू केली. त्यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. परिसरातील नागरिक, विशेषतः महिलांनी रोख आणि ऑनलाईनद्वारे या भिशीमध्ये १ हजार रुपयांपासून २२ हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केली. दरमहा गुंतवणूक केल्यास वार्षिक १० टक्के, तर एकरकमी गुंतवणुकीवर १२ ते १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. पहिली दोन वर्षे ही भिशी सुरळीत चालली. मात्र, २०२२ ते २०२४ या काळात शिंदे दाम्पत्याने भिशीची रक्कम गोळा केली पण त्याचे सभासदांना वितरण केले नाही.

मुदतीनंतर गुंतवलेली रक्कम व्याजासह परत मिळवण्यासाठी सभासदांनी वारंवार तगादा लावला. मात्र, शिंदे दाम्पत्याने रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर, सभासदांचा ससेमिरा टाळण्यासाठी या दाम्पत्याने राजेंद्रनगरमधील आपले राहते घरही विकून पलायन केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच थोरवत यांच्यासह अन्य सभासदांनी आर्थिक गुन्हे शाखा आणि राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ऑगस्ट २०२५ मध्ये ४० महिलांनी याबाबत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे अर्ज केला होता. पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की–कवळेकर यांनी तपास करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

सध्या दाखल फिर्यादीनुसार फसवणुकीची रक्कम २५ लाख रुपये असली तरी, तपासाधिकार्‍यांनी फसवणुकीचा आकडा दीड ते पावणे दोन कोटी रुपयांपर्यंत असावा, असा संशय व्यक्त केला आहे. फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवली असून, संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके आडी शिरगाव (जि. रत्नागिरी) आणि पुण्याकडे रवाना झाली आहेत. संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले आहे. दरम्यान, फसगत झालेल्या सभासदांनी रविवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी केली होती.

Total Visitor Counter

2651783
Share This Article