कडवई : भारतीय जनता पार्टीच्या नावडी जिल्हा परिषद गटाच्या वतीने आयोजित मंगळागौर स्पर्धा २०२५ मयूरबाग,लोवले येथील शुभगंधा हॉलमध्ये पार पडल्या.या स्पर्धेत संगमेश्वर नावडी येथील अमृता ग्रुपच्या महिलांनी सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेसाठी बारा मिनिटांची वेळ देण्यात आली होती. या बारा मिनिटांमध्ये या ग्रुपच्या महिलांनी ५७ प्रकारचे खेळ सादर केले.त्यामध्ये २७ प्रकारच्या फुगड्यांचा समावेश होता.मंगळागौरीच्या खेळातील प्रत्येक खेळ अतिशय नियोजनबद्ध आणि अभ्यासपूर्वक करून उत्तम सादरीकरण त्याबरोबर नृत्याची साथ तबला, पेटी, घुंगुर आणि उत्तम गायन आणि महिलांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे त्यांना यश मिळविणे सोपे झाले.प्रमुख पाहुणे प्रतीक देसाई, दीपिका जोशी नुपूर मुळे व झगडे यांच्या हस्ते त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
संगमेश्वरमध्ये गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या निमित्ताने लोकनृत्य स्पर्धा किंवा मंगळागौर स्पर्धा भरवल्या जातात. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये अमृता ग्रुपच्या महिला सहभागी होतात व विजयश्री खेचून आणतात.या श्रावण महिन्यामध्ये झालेल्या भाजप संगमेश्वर तालुका लोकनृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, श्रावण महोत्सव संगमेश्वर पारंपारिक कोकणी महिला लोक नृत्य स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक, उदय सामंत प्रतिष्ठान आयोजित श्रावण उत्सव मंगळागौर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आणि भाजप रत्नागिरी दक्षिण नावडी जिल्हा परिषद गट मंगळागौर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक या महिलांनी प्राप्त केलेला आहे.
या ग्रुपमध्ये सविता हळदकर, जान्हवी चिचकर, आर्या मयेकर, सुविधा शेट्ये,सुप्रिया कदम,पायल नागवेकर,मानसी पालकर,निधी सुर्वे, सानिका कदम,ईश्वरी माईन,अर्पिता शेरे,अमृता कोकाटे महिलांनी सहभाग घेतला.आर्या कोकाटे हिने मंगळागौरीची गाणी उत्तमरित्या सादर केली तसेच गायत्री मयेकर हिने घुंगुर वादन, गिरीराज लिंगायत तबलावादक आणि पेटीवादक शिवम भोसले यांनी अतिशय सुंदर वादन करून प्रेक्षक आणि परीक्षकांची मने जिंकली. अमृता ग्रुपच्या यशाबद्दल संपूर्ण संगमेश्वर परिसरातून ग्रुपचे कौतुक होत आहे.