दापोली: दापोली तालुक्यातील लाडघर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या तीन वर्षांच्या मुलीसह एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी गितेश मस्कर (वय २३) आणि तिची मुलगी श्रीशा गितेश मस्कर (वय ३) या दोघी लाडघर येथील शंकरवाडीत असलेल्या त्यांच्या माहेरी, विनया विलास घडवले यांच्या घरी राहण्यासाठी आल्या होत्या. २९ जून रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मानसी आपली मुलगी श्रीशा हिला घेऊन कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली.
रात्र झाली तरी त्या दोघी घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. तसेच, त्यांच्या ओळखीच्या आणि नातेवाईकांकडेही चौकशी केली, मात्र त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर, मुली आणि नातीची कोणतीही खबर न मिळाल्याने मानसी मस्कर यांच्या आई विनया विलास घडवले यांनी ३० जून रोजी दापोली पोलीस स्थानकात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
दापोली पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ तपास सुरू केला असून, आई आणि मुलीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे लाडघर परिसरातील नागरिक चिंतेत असून, लवकरच त्या दोघी सुरक्षित परत याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.