खेडमध्ये नागरी सुविधांच्या अभावावरून छेडले आंदोलन
रत्नागिरी : खेड शहरातील नागरी समस्यांकडे सातत्याने प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने खेडमधील सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा मोरे हे आजपासून (दि. ७ जुलै २०२५) जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. याआधी विविध मुद्द्यांवर उपोषण करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
खेड नगरपरिषदेचा दवाखाना पूर्ववत सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून करण्यात येत आहे. मंगेश मोरे यांनी १ मे २०२५ रोजी याच मागणीसाठी उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने १२ तासांत लेखी उत्तर देत, वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले होते. मात्र, दोन महिने उलटूनही दवाखाना अद्याप सुरू झालेला नाही.
याशिवाय, खेड-डेंटल कॉलेज मुख्य रस्त्यावर असलेले मोठ्या प्रमाणातील खड्डे देखील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरते खड्डे भरले असले, तरी पहिल्याच पावसात हे काम निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. यासंदर्भात उपोषणावेळी प्रशासनाकडून डांबरीकरणाचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ते काम समाधानकारक न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तसेच, भोस्ते ग्रामपंचायत हद्दीतील खेड रेल्वे स्टेशन मार्गावरील स्लॅबही खराब अवस्थेत आहेत. यासाठी मोरे यांनी २६ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद विभागाकडून तात्काळ रस्ता दुरुस्तीचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु, त्या कामाचाही दर्जा अत्यंत खराब असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर रस्ता प्रवासी, वाहनधारक, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठीही धोकादायक बनला आहे.
या सर्व समस्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर मंगेश मोरे यांनी लोकशाही मार्गाचा अवलंब करून आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आहे. उपोषणस्थळी त्यांनी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची प्रतही सोबत जोडली आहे. आता प्रशासन या उपोषणाकडे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.