पाईप क्लीनरपासून आकर्षक फुले निर्मितीचे प्रशिक्षण; खेड नगरपरिषदेकडून महिलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

Gramin Varta
85 Views

खेड (प्रतिनिधी) : महिलांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्या कौशल्याला व्यावसायिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने खेड नगरपरिषद आणि महिला बालकल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी पाईप क्लीनरपासून आकर्षक फुले तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या प्रशिक्षण उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

प्रशिक्षणादरम्यान पाईप क्लीनरचा वापर करून विविध रंगांची आणि आकर्षक स्वरूपाची फुले तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. सहभागी महिलांनी प्रत्यक्ष फुले तयार करून या कलेचा अनुभव घेतला. सहज उपलब्ध आणि कमी खर्चातील साहित्याचा कल्पकतेने वापर करून सजावटीच्या वस्तू तयार करता येतात, हा संदेश या प्रशिक्षणातून देण्यात आला. तयार केलेल्या फुलांचा घराची सजावट तसेच विविध कार्यक्रमांच्या सजावटीसाठी उपयोग करता येणार असल्याने महिलांना या कौशल्याचा भविष्यात आर्थिकदृष्ट्याही फायदा होऊ शकतो.

महिला बालकल्याण समितीच्या सभापती रसिका खेडेकर तसेच समितीच्या सदस्यांच्या सहकार्यामुळे हा प्रशिक्षण उपक्रम यशस्वीपणे पार पडला. खेड शहरात महिलांच्या कौशल्यविकासाला चालना देणारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, खेड नगरपरिषद आणि महिला बालकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील मुलींसाठी लवकरच लाठी-काठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. मुलींमध्ये आत्मविश्वास वाढविणे, स्वसंरक्षणाची प्राथमिक कौशल्ये विकसित करणे आणि शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे, हा या प्रशिक्षणामागील उद्देश आहे.

खेड नगरपरिषद आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना विविध उपक्रमांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. महिलांनी तसेच मुलींनी अशा प्रशिक्षण आणि कौशल्यविकासाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग करून घ्यावा, असे आवाहन नगरसेविका निता आंब्रे यांनी केले.

महिला व मुलींच्या कौशल्यविकासासोबतच त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे विविध उपक्रम आगामी काळातही राबविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासन आणि महिला बालकल्याण समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

Total Visitors :
4788136
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *