चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गालगत कापसाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातून ऍल्युमिनिअम वायरची चोरी करताना दोघा चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रंगेहात पकडले. शनिवारी रात्री १.३० च्या सुमारास घडलेल्या या घटनेत एक अल्पवयीन मुलगा असून, दुसरा आरोपी हा मूळ उत्तर प्रदेशातील आहे. पोलिसांनी दोघांकडून सुमारे १.१० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव अबरार इकरार शेख (२१, सध्या रा. कापसाळ, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे असून, त्याच्यासोबत असलेला दुसरा तरुण अल्पवयीन आहे आणि तो आंबेशेत येथील असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी विवेक वसंत भोजने (३४, रा. कापसाळ) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, त्यांनी कापसाळ येथील जिल्हा परिषद शाळेजवळ काही ऍल्युमिनिअम वायरची बंडल ठेवली होती. शनिवारी रात्री अबरार आणि त्याचा अल्पवयीन साथीदार हे दोघेही दुचाकीवरून ती वायर चोरी करत असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या लक्षात आले. संशय आल्याने पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, अधिक चौकशीनंतर चोरीचा प्रकार उघड झाला.
या कारवाईत पोलिसांनी अंदाजे ७० हजार रुपये किंमतीचे ऍल्युमिनिअम वायरचे बंडल आणि ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली आहे. अबरारला पोलिसांनी अटक केली असून, अल्पवयीन साथीदारावर स्वतंत्र प्रक्रियेनुसार कारवाई केली जात आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, रोशन पवार, पितेश शिंदे, संदीप मानके आणि रुपेश जोगी यांच्या पथकाने केली.
या घटनेमुळे परिसरात चोरीच्या घटनांबाबत जागरूकता वाढली असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा मुद्देमाल वाचवण्यात यश मिळाले आहे.
चिपळूणच्या कापसाळ येथे ऍल्युमिनिअम वायर चोरीप्रकरणी दोघे जेरबंद; एक अल्पवयीन
