GRAMIN SEARCH BANNER

साखरी नाटे गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्याची मागणी

नाटे/ राजन लाड: साखरी नाटे गावासाठी स्वतंत्र पोलीस पाटील नेमण्यात यावा, किंवा तात्पुरता कार्यभार शेजारील घेरा यशवंतगड येथील पोलीस पाटील फैजान वाडकर यांच्याकडे सोपवावा, अशी मागणी साखरी नाटे ग्रामपंचायतीने केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने आमदार किरण सामंत यांच्यासह उपविभागीय अधिकारी आणि राजापूर तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

साखरी नाटे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील साखरी नाटे गावासाठी सध्या पोलीस पाटील पद रिक्त आहे. या रिक्त पदावर स्वतंत्र नियुक्ती करावी किंवा तात्पुरता कार्यभार घेरा यशवंतगड महसूल गावाचे सध्याचे पोलीस पाटील श्री. फैजान वाडकर यांच्याकडे सोपवावा, अशी शिफारस ग्रामपंचायतीने केली आहे. याबाबत २३ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या ग्रामसभेत एकमताने ठराव संमत करून तो राजापूर तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

सध्या साखरी नाटे गावाच्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार सौ. श्रुतिका सचिन पवार यांच्याकडे आहे. मात्र, त्या नाटे आणि भराडीन या गावांमध्येही कार्यरत असल्यामुळे साखरी नाटे गावासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. साखरी नाटे हे मोठे आणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. येथे ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडी यांसह विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबवल्या जातात. या पार्श्वभूमीवर, घेरा यशवंतगड येथील अनुभवी आणि तंत्रज्ञानस्नेही पोलीस पाटील श्री. फैजान वाडकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपवल्यास कायदा-सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.

या मागणीवर राजापूरचे तहसीलदार श्री. विकास गमरे यांनी सांगितले की, “सदर ठराव आणि विनंती आमच्या कार्यालयात प्राप्त झाली आहे. मात्र, सध्या कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांकडून काम व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे कार्यभार बदलायचा की नाही, हा संपूर्ण अधिकार आमचा असून, ग्रामपंचायतीकडून आलेल्या प्रस्तावाचा विचार करून लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल.”
साखरी नाटे ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी आणि शासकीय व्यवहारांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी पोलीस पाटील पदाचा कार्यभार बदलणे आवश्यक असल्याची ग्रामस्थांची भूमिका आहे. आता तहसील कार्यालयाकडून या प्रस्तावावर अंतिम निर्णयाची आणि प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article