रत्नागिरी : निवळी-गणपतीपुळे मार्गावरील ओरी मधलीवाडी येथे शनिवारी सायंकाळी इंद्रधनु हॉटेलजवळ ट्रकचा अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट रस्ता सोडून जंगलात घुसला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रसंगावधान राखत चालकाने गाडीतून उडी मारल्याने तो बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून जयगडच्या दिशेने जाणारा ट्रक ओरी येथील अवघड वळणावरून जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. ट्रक धडाडत रस्ता सोडून जंगलात घुसला. या आवाजाने परिसरातील नागरिक धावून आले. ट्रकच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले असून, अपघातामुळे काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला.
विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच वळणावर तीन ट्रक बंद पडले होते. त्यापैकी दोन ट्रक दुरुस्ती करून नेण्यात आले, मात्र एक अद्यापही तिथेच आहे. आता पुन्हा अपघात झाल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत असून, अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
रत्नागिरी : ओरी येथे ट्रकला अपघात; ताबा सुटल्याने थेट घुसला जंगलात; चालक बचावला
