विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय; १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व

Gramin Varta
151 Views

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत विरोधी पक्षांचा धुव्वा उडवला आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने १६ जागांवर विजय मिळवला असून, नाशिकच्या जागेवर विजयी झालेले अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनीही शिवसेना शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीचे संख्याबळ १७ वर पोहोचले आहे. निवडणुकीच्या निकालातून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून, सत्ताधारी आघाडीने आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

भाजपचे ११ उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) २ उमेदवार विजयी झाले आहेत. नागपूरमध्ये डॉ. राजीव पोतदार, धाराशिव-बीड-लातूरमध्ये बसवराज पाटील, सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, जळगावमधून नंदकिशोर महाजन, छत्रपती संभाजीनगर-जालना जागेवर सुहास सिरसाट, सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत, नांदेडमध्ये अमरनाथ राजूरकर, भंडारा-गोंदियात अविनाश ब्राह्मणकर आणि अमरावतीमध्ये प्रवीण पोटे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजय मिळवला.

याशिवाय, सहा जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते, ज्यामध्ये विक्रम काकडे, प्राजक्त तनपुरे, रविंद्र फाटक, अनिकेत तटकरे, दुष्यंत चतुर्वेदी आणि अरुण लखानी यांचा समावेश आहे. परभणी-हिंगोली मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या सईद खान यांनी बाजी मारली. विरोधी पक्षांच्या अनेक उमेदवारांना या निवडणुकीत नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला असून, विशेषतः अमरावतीमध्ये काँग्रेस उमेदवाराला शून्य मते मिळाल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

Total Visitors :
4580925
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *