खेड : खेड-खोपी मार्गावरील वेरळजवळ सोमवारी सायंकाळी एका अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दोनजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी तातडीने धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दीपक अशोक पदुमले (वय ३८, रा. खोंडे) आणि किरण रघुनाथ सकपाळ (वय ४५, रा. भडगाव) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत असताना, पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती, की दोघेही रस्त्यावर कोसळले आणि गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सूरज हंबीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.