रत्नागिरी: सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सेवा हाच संकल्प भारत हीच प्रेरणा या संकल्पनेतून व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान’ सुरू केले आहे. या अभियानाचा शुभांरभ 17 सप्टेंबर रोजी मुंबई येथे होणार आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान ग्रामीण व शहरीस्तरावर राबविण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी आरोग्य केंद्र किंवा अंगणवाडी केंद्रांशी संपर्क साधावा.
अभियानाचा मुख्य उद्देश महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे आणि त्याद्वारे एक सशक्त कुटुंब आणि समाज निर्माण करणे हा आहे. राष्ट्राच्या आरोग्य दृष्टीकोनात बदल घडविण्यासाठी संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी उपचार सेवा आणि पोषण यावर भर देण्यात येणार आहे.
या अभियानामध्ये देशभरात आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. महिलांना विविध आरोग्य सेवा पुरवण्यावर भर दिला जात आहे, ज्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, नेत्ररोग तपासणी, दात आणि मुखाचे आरोग्य तपासणे, गरोदर महिलांची तपासणी, लसीकरण आणि सिकल सेल, रक्तक्षय रोगांची तपासणी या गोष्टींचा समावेश आहे.
स्थानिक आणि पारंपरिक आहाराला प्रोत्साहन, स्तनदा माता आणि लहान मुलांसाठी पौष्टिक आहार, मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल मार्गदर्शन आणि टेक-होम रेशन (THR) चे वाटप यावर भर दिला जाणार आहे.
अभियान यशस्वी करण्यासाठी रक्तदान शिबिर, अवयवदान नोंदणी आणि निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी यांसारख्या उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल.
माता आणि बालक सुरक्षा कार्ड, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना नोंदणी, आयुष्यमान वय वंदना कार्ड, सिकल सेल कार्ड आणि पोषण ट्रॅकर यांसारख्या महत्त्वाच्या योजनांमध्ये महिलांची नोंदणी केली जाईल.