GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेचा ऐतिहासिक टप्पा: महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर सुरू!

Gramin Search
41 Views

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

चिपळूण: पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चिपळूण नगर परिषदेने एक मैलाचा दगड रोवला आहे. राज्यात पहिल्यांदाच एखाद्या नगर परिषदेने स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करण्याचा मान मिळवला असून, राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते शनिवारी सकाळी या केंद्राचे थाटात लोकार्पण करण्यात आले. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारी उभारण्यात आलेले हे चार्जिंग सेंटर, ‘माझे वसुंधरा’ अभियानांतर्गत मिळालेल्या पारितोषिकाच्या ९ लाख रुपयांच्या निधीतून विकसित करण्यात आले आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनलेल्या ना. उदय सामंत यांनी चिपळूण नगर परिषदेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. “चिपळूण नगर परिषदेने स्वयंचलित इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटर सुरू करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक उल्लेखनीय पाऊल उचलले आहे. अशा प्रकारचा उपक्रम राबवणारी ही महाराष्ट्रातील पहिली नगर परिषद ठरली असून, ही संकल्पना इतर ठिकाणीही राबवण्यासारखी आहे. चिपळूणचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या धाडसी पावलाची प्रेरणा घेऊन आता मी रत्नागिरीतही असे चार्जिंग सेंटर सुरू करीत आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या चार्जिंग सेंटरमुळे शहरातील इलेक्ट्रिक दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

याच कार्यक्रमात चिपळूणकरांच्या आरोग्यासाठीही एक महत्त्वाचा उ

पक्रम राबवण्यात आला. हनुमान व्यायाम शाळेमध्ये जिल्हा नियोजन निधीतून १४ प्रकारचे आधुनिक व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे चिपळूणकरांना आरोग्यदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

‘ग्रीन चिपळूण’च्या दिशेने यशस्वी वाटचाल

चिपळूण नगर परिषदेच्या या पर्यावरणपूरक व आरोग्यवर्धक उपक्रमांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. या लोकोपयोगी योजनांमुळे चिपळूणचे नाव विकासदृष्ट्या राज्यात पुढे गेले असून, अशाच प्रयत्नांमुळे ‘ग्रीन चिपळूण’ साकार होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, माजी आमदार सदानंद चव्हाण, रत्नागिरी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, माजी नगरसेवक परिमल भोसले, नगरसेविका स्वाती दांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, डीवायएसपी राजेंद्रकुमार राजमाने, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, नगरसेवक वासुदेव मेस्त्री, नगरसेवक निहार कोवळे, नगरसेविका अदिती देशपांडे, नगरसेविका रिहाना बिजले, आरोग्य विभागाचे वैभव निवाते, उद्यान विभागाचे बापू साडविलकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दशरथ दाभोळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे, शहर प्रमुख सकपाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3374167
Share This Article