GRAMIN SEARCH BANNER

लोटे एमआयडीसीतील पुष्कर कंपनीबाहेर गरम मातीत पडून महिलेचा मृत्यू

Gramin Varta
26 Views

खेड :तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात असलेल्या पुष्कर कंपनीच्या बाहेरील गरम मातीत पाय घसरून पडल्याने गंभीर भाजलेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला आहे. शकुंतला बबन सोनवणे (वय ४८, सध्या रा. बहादुरशेख नाका, चिपळूण; मूळ रा. पाचगणी-मानेचीवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) असे मृत महिलेचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत शकुंतला सोनवणे या १२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक ललिता सोनवणे यांच्यासह लोटे एमआयडीसीतील पुष्कर कंपनीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत टाकाऊ कचरा आणि सामान गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. कंपनीच्या भट्टीतील लोखंडी कास्टिंग करून काढलेली अत्यंत गरम माती त्या ठिकाणी टाकण्यात आली होती. कचरा वेचत असताना अचानक शकुंतला यांचा पाय घसरला आणि त्या या धगधगत्या गरम मातीत पडल्या. या अपघातात त्यांच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला आणि कमरेपासून खालचा भाग व दोन्ही हात गंभीररीत्या भाजले गेले.

घटनेनंतर त्यांना तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर २२ मार्च २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3391816
Share This Article