संगमेश्वर : येथील रेल्वे स्थानकावर १८ जून २०२५ रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास रेल्वेच्या धडकेने राजू रामविलास यादव (वय ३९, रा. हातिमपूर, जि. देवरिया, राज्य उत्तरप्रदेश) या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इंदलकुमार श्रीप्रसाद (रा. हाटा, जि. कुशीनगर, उत्तरप्रदेश) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू यादव आणि इंदलकुमार हे केरळ येथे रस्त्याच्या गटाराचे कॉंक्रीटचे काम करण्यासाठी आले होते. १६ जून २०२५ रोजी रात्री १०.३० वाजता ते गोरखपूर येथून गोरखपूर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रेल्वेगाडीमध्ये बसून १८ जून २०२५ रोजी मुंबई येथे उतरले. त्यानंतर केरळला जाण्यासाठी त्यांनी नेत्रावती एक्सप्रेस गाडीच्या जनरल डब्याने प्रवास सुरू केला.
१८ जून रोजी सायंकाळी ६.११ वाजता सदर रेल्वे गाडी संगमेश्वर रेल्वे स्टेशन येथे क्रॉसिंगला थांबली असता, मयत राजू यादव रेल्वे रुळाच्या बाजूला लघुशंका करत होते. त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसची त्यांना धडक बसली. या धडकेमुळे राजू यादव यांच्या हाताला आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली.
तात्काळ त्यांना खाजगी ॲम्बुलन्सने ग्रामीण रुग्णालय, संगमेश्वर येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे हलवले. मात्र, रत्नागिरी येथे उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची संगमेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संगमेश्वर रेल्वे स्थानकावर प्रवाशाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
