GRAMIN SEARCH BANNER

परतीचा प्रवास करताना कोकणवासीयांचे होणार हाल; जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस दादरपर्यंतच धावणार

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीएसएमटी) फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी तेजस आणि जनशताब्दी एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे.

तर, मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे. तिन्ही मार्गांवर ३१ ऑगस्टपर्यंत हे वेळापत्रक लागू असणार आहे. त्यामुळे कोकणातून मुंबईत परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

गेल्या अनेक कालावधीपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे कामे सुरू आहे. त्यामुळे या फलाटावरील रेल्वेगाड्यांचा थांबा इतर फलाटावर केला जातो. तसेच, काही रेल्वेगाड्या फलाटाअभावामुळे सीएसएमटीमधील थांबा रद्द केला जातो. सध्या सुरू असलेल्या पायाभूत कामांमुळे गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस दादरपर्यंत चालवून अंशत: रद्द करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचे वेळापत्रक ३० ऑगस्टपर्यंत लागू असेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १० ते १३ या फलाटांच्या विस्तारीकरणासाठी एकूण ६२.१२ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला २०१५-१६ रोजी मंजुरी मिळाली. त्यानंतर या फलाटांची लांबी ३०५ मीटर ते ३८५ मीटरने वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १० आणि ११ च्या विस्तारीकरणाचे काम २ जून २०२४ रोजी पूर्ण झाले. या कामामुळे फलाट २४ डब्यांच्या रेल्वेगाड्या धावण्यास सक्षम झाला. त्यानुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई-कोल्हापूर आणि मुंबई-होसपेटे या एक्स्प्रेसच्या डब्यांत कायमस्वरूपी वाढ करण्याची घोषणा केली. तर, सध्या फलाट क्रमांक १२, १३ चे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे ६ ते ८ रेल्वेगाड्यांच्या डब्यांत वाढ होईल.

परतीचा प्रवास सुरू

कोकणातील दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करून भाविकांनी परतीचा प्रवास सुरू केला. परंतु, मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावेल. त्यामुळे ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागेल. ठाणे स्थानकात सामानासह उतरून पुन्हा लोकल किंवा पर्यायी वाहनाने मुंबईत यावे लागेल. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागेल.

Total Visitor Counter

2475231
Share This Article