GRAMIN SEARCH BANNER

विकास नर यांची ‘अभंग वारी’ कार्तिकी एकादशीनिमित्त आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार!

Gramin Varta
23 Views

रत्नागिरी:कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर, श्रोत्यांना भक्तीरसात तल्लीन करणारा विशेष कार्यक्रम ‘अभंग वारी’ आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची खास निर्मिती असलेला हा कार्यक्रम २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ३० मिनिटांनी ऐकता येणार आहे.

सिंधुदुर्ग येथील ख्यातनाम गायक विकास नर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा ‘अभंग वारी’ हा अभंगांचा कार्यक्रम अतिशय श्रवणीय पद्धतीने सादर केला आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला अजित गोसावी आणि पंडीत अवधूत बाम यांचे उत्कृष्ट संगीत लाभले आहे.
या कार्यक्रमातील वाद्यवृंदाची साथसंगतही तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. हार्मोनियमवर स्वतः विकास नर, पखवाजवर दर्शन घाडीगावकर आणि तबल्यावर पंकज सावंत यांनी साथ दिली आहे.
या भक्तीमय सादरीकरणाला नागेश घोगरे, प्रफुल्ल गावडे, संतोष तळेकर, रघुनाथ परब, राजेश खानोलकर, श्रीपाद बाणे, शशांक तळेकर आणि अंकित घाडीगावकर यांनी कोरस देऊन अधिक उंचीवर नेले आहे.

या विशेष कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सुनील गायकवाड असून, रसिक श्रोत्यांसाठी हा कार्यक्रम विविध माध्यमांवर उपलब्ध असणार आहे. श्रोते हा कार्यक्रम मध्यम लहरींवरील ११४३ किलो हर्ट्झ तसेच एफ. एम. वाहिनीवरील १०१.५ मेगाहर्ट्झ वर ऐकू शकतील. याव्यतिरिक्त, ‘न्यूज ऑन एआयआर’ या थेट मोबाईल ॲपवर देखील तो उपलब्ध असेल.

तरी, रसिक श्रोत्यांनी कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिवशी या भक्तिमय ‘अभंग वारी’ कार्यक्रमाचा अवश्य आनंद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3199508
Share This Article