मुंबई: मराठी चित्रपटांमध्ये अनेकदा प्रेक्षकांसाठी छोट्या-छोट्या सरप्राईजेसची पेरणी केली जाते. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ मध्येही असंच एक खास सरप्राईज दडलं आहे.
मकरंद अनासपुरे यांचा या चित्रपटात एक भन्नाट कॅमिओ आहे आणि त्या छोट्याशा भूमिकेतही त्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवली आहे.
या कॅमिओमधील सर्वात खास बाब म्हणजे मकरंद अनासपुरेंच्या तोंडी असलेला एक हटके संवाद. हा संवाद लिहिताना त्यांच्या कारकिर्दीतील ‘उलाढाल’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘खबरदार’, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’, ‘नऊ महिने नऊ दिवस’, ‘गाढवाचं लग्न’, ‘दोघात तिसरा आता सगळं विसरा’, ‘तुक्या तुकविला नाग्या नाचविला’, ‘मला एक चान्स हवा’, ‘डावपेच’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘दे धक्का’, ‘दणक्यावर दणका’ आणि ‘साडे माडे ३’ या गाजलेल्या चित्रपटांच्या नावांचीच हुशारीने गुंफण करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, हा संवाद ऐकताना सुरुवातीला तो एक साधा संवाद वाटतो, मात्र लक्षपूर्वक ऐकल्यावर त्यामध्ये मकरंद अनासपुरेंच्या चित्रपटांची नावं एकामागोमाग एक गुंफलेली असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हा प्रसंग म्हणजे सुखद सरप्राईज आहे.
दिग्दर्शक विजू माने यांनी मकरंद अनासपुरेंच्या कारकिर्दीला दिलेली ही भन्नाट आणि आगळीवेगळी सलामी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. छोटासा कॅमिओ, तरीही त्यात दडलेली ही कल्पकता ‘मामाच्या गोव्याला जाऊया’मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सरप्राईजपैकी एक ठरत आहे.
विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. कुशल बद्रिके, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३१ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा हटके ट्विस्ट; अनासपुरेंच्या १५ चित्रपटांची अनोखी गुंफण
Leave a Comment





