काळीज पिळवटून टाकणारी घटना; घरात झालेल्या भांडणातून आई व मुलीची रेल्वेखाली आत्महत्या

Gramin Varta
547 Views

सोलापूर : पतीसोबत झालेल्या वादानंतर मध्यरात्री माहेरी गेलेल्या ३३ वर्षीय विवाहितेने १४ वर्षांच्या मुलीसह टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना सोलापुरात घडली. होटगी रोडवरील आयकर भवनामागील रेल्वे रुळावर रविवारी पहाटे आई आणि मुलीचे मृतदेह आढळून आले. वर्षा पांडुरंग आधटराव (वय ३३) आणि स्वरा पांडुरंग आधटराव (वय १४, दोघी रा. सुशील नगर, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.

सैफूल परिसरातील पांडुरंग आधटराव यांचा वर्षा वाघमारे यांच्याशी विवाह झाला होता. पांडुरंग डी-मार्टमध्ये कामाला असून, शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर रात्री बाराच्या सुमारास पांडुरंग यांनी पत्नी वर्षा आणि मोठी मुलगी स्वराला तिच्या मावशीकडे माहेरी आणून सोडले. त्यानंतर ते आपल्या घरी परतले.

मात्र काही वेळाने, मध्यरात्री साडेबारा ते एकच्या सुमारास वर्षा आणि स्वरा मावशीच्या घरातून बाहेर पडल्या. दोघी आसरा ब्रिजच्या परिसरातून रेल्वे मार्गाच्या दिशेने गेल्या. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास रेल्वे पोलिसांना रुळावर दोघींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर विजापूर नाका पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ओळख पटवली आणि नातेवाइकांना माहिती दिली.

दोघींना सकाळी साडेसातच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे आधटराव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, वर्षा आणि पांडुरंग यांच्यात यापूर्वीही वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. पती आणि सासूच्या त्रासाला कंटाळून वर्षाने काही महिन्यांपूर्वी शहर पोलिस आयुक्तालयातील महिला सुरक्षा कक्षाकडे म्हणजेच ‘भरोसा सेल’कडे तक्रार केली होती. पोलिसांनी समुपदेशन करून पती-पत्नीमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतरही दोघांमधील वाद सुरूच राहिल्याची माहिती वर्षाच्या भावाने विजापूर नाका पोलिसांना दिली.

शनिवारी रात्री झालेल्या वादानंतर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमागे नेमके कोणते कारण होते, याचा तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत. या घटनेने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4590859
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *