मुंबई : महाराष्ट्र सरकारने कॅब एग्रीगेटर्सशी संबंधित चालकांसाठी पाच दिवसांचा प्रारंभिक प्रशिक्षण कार्यक्रम अनिवार्य केला आहे. हे प्रशिक्षण ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात येणार असून, एग्रीगेटर्सनी प्रशिक्षणाचा संपूर्ण तपशील ऑनलाइन उपलब्ध करून तो निश्चित पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक असणार आहे.
या प्रशिक्षणामध्ये चालकांना एग्रीगेटरच्या मोबाइल ॲपचा वापर, संबंधित कायदे व नियम, मोटार वाहन (चालवणे) विनियम २०१७, काळजीपूर्वक वाहन चालवणे, वाहतुकीचे नियम, वाहनांची देखभाल आणि इंधन-कार्यक्षम वाहन चालवण्याबाबत माहिती दिली जाणार आहे. तसेच प्रवाशांशी योग्य वर्तन आणि विविध आवश्यक बाबींचेही प्रशिक्षण चालकांना दिले जाणार आहे.
रस्ते अपघाताच्या वेळी तातडीने मदत करता यावी, यासाठी चालकांना किमान सहा तासांचे प्रथमोपचार प्रशिक्षण देणेही अनिवार्य करण्यात आले आहे. महिलांची सुरक्षा, दिव्यांग व्यक्तींच्या गरजा आणि त्यांच्या सुरक्षित प्रवासाची खात्री यावरही प्रशिक्षणात विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय राज्य सरकारकडून वेळोवेळी आवश्यकतेनुसार इतर प्रशिक्षणांचे आयोजन केले जाणार आहे.
दरम्यान, एग्रीगेटरला परवाना मिळाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सेवा सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कालावधीत सेवा सुरू न केल्यास संबंधित परवाना आपोआप रद्द होईल. अशा परिस्थितीत सुरक्षा ठेव परत केली जाईल; मात्र परवाना शुल्क परत केले जाणार नाही.
सर्व एग्रीगेटर्सना आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणेही आवश्यक असणार आहे. चालक आणि एग्रीगेटर कंपनी यांच्यातील कराराच्या अटींबाबत माहिती देणे प्रशिक्षणाचा अनिवार्य भाग असेल.
नियमांनुसार, परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर एका वर्षाच्या आत IDTR, RDTC आणि ADTC यांसारख्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये विद्यमान सर्व चालकांना प्रशिक्षण देण्याची योजना एग्रीगेटरने सादर करणे आवश्यक आहे. या नव्या नियमांमुळे कॅब चालकांच्या प्रशिक्षणासोबतच प्रवाशांची सुरक्षा आणि सेवा गुणवत्ता सुधारण्यावर सरकारचा भर असल्याचे स्पष्ट झाले आहे.





