१४ महिन्यांनंतर माधुरीची नांदणीत घरवापसी; गुलाल उधळून ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत

Gramin Varta
26 Views

कोल्हापूर : गेल्या १४ महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून नांदणी मठाची लाडकी हत्तीण माधुरी पुन्हा आपल्या गावी परतली आहे. गुजरातमधील वनतारा रेस्क्यू सेंटरमध्ये देखभाल व उपचार घेतल्यानंतर माधुरीने कोल्हापूरकडे प्रवास केला आणि रात्री उशिरा नांदणीत दाखल होताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत तिचे जल्लोषात स्वागत केले. माधुरीच्या आगमनाने संपूर्ण नांदणी परिसरात भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले.

माधुरीच्या परतीसाठी गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरकरांकडून सातत्याने मागणी केली जात होती. नांदणीशी तिचे असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन तिच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला. वनतारामधील आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर माधुरीला कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले. सुमारे ४८ तासांचा प्रवास पूर्ण करून ती मुंबई, पुणे मार्गे कोल्हापुरात पोहोचली.

माधुरीच्या स्वागतासाठी नांदणी ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली होती. गावातील विविध ठिकाणी स्वागताचे फलक उभारण्यात आले होते. माधुरी परतल्याची वार्ता मिळताच नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आनंद व्यक्त केला. यावेळी वनतारा रेस्क्यू सेंटरच्या सहकार्याबद्दल आणि माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्यासाठी घेतलेल्या भूमिकेबद्दल आभार मानण्यात आले. काही ठिकाणी वनताराचे संस्थापक अनंत अंबानी यांच्या अभिनंदनाचे आणि आभाराचे फलकही लावण्यात आले होते.

माधुरीच्या परतीसोबतच तिच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची जबाबदारीही महत्त्वाची ठरणार आहे. वनतारा रेस्क्यू सेंटरच्या सहकार्याने नांदणीमध्ये माधुरीसाठी आवश्यक पुनर्वसन सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तिच्या आरोग्याची नियमित देखरेख, वैद्यकीय तपासणी तसेच तिच्या शारीरिक गरजांनुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हत्तींच्या आरोग्यासाठी पाय व सांध्यांची निगा, नियमित वैद्यकीय निरीक्षण, योग्य व्यायाम आणि आवश्यक उपचार यांना विशेष महत्त्व असते. त्याच पार्श्वभूमीवर नांदणीतील केंद्रातही अत्याधुनिक पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

माधुरीला मोकळ्या वातावरणात हालचाल करता यावी, तिच्या पायांवर व सांध्यांवर अनावश्यक ताण येऊ नये, यासाठी मऊ वाळू, विशेष फ्लोअरिंग, पाण्यात व्यायामाची सुविधा तसेच वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. वनतारामध्ये हत्तींच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या आधुनिक पद्धतींच्या धर्तीवर माधुरीच्या आरोग्याची काळजी नांदणीमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

माधुरीच्या देखभालीसाठी हायपावर कमिटीनेही काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. माधुरीवर चोवीस तास देखरेख ठेवणे, किमान पंधरा दिवसांतून एकदा तिची वैद्यकीय तपासणी करणे आणि दर महिन्याला तिच्या आरोग्याचा अहवाल समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. तिचा मिरवणूक, परेड, धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, मनोरंजन अथवा भीक मागण्यासाठी वापर करता येणार नाही. तसेच १८ वर्षांखालील मुले किंवा प्रशिक्षित नसलेल्या व्यक्तींना तिच्याशी थेट शारीरिक संपर्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षणासंदर्भातील कायदे आणि तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक असून संबंधित अधिकाऱ्यांना माधुरीच्या व्यवस्थेची पाहणी करण्याचा अधिकार राहणार आहे.

दरम्यान, माधुरीच्या परतीबाबत बोलताना राजू शेट्टी यांनी वनताराच्या भूमिकेचे कौतुक केले. लोकभावनेचा आदर करून माधुरीला पुन्हा नांदणीत आणण्याचा शब्द वनताराने दिला आणि तो पाळला, असे त्यांनी सांगितले. माधुरीसाठी नांदणीमध्ये उभारण्यात आलेल्या सुविधांचा उल्लेख करत त्यांनी येथेच ‘मिनी वनतारा’ उभारल्याचेही म्हटले. त्यामुळे १४ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माधुरी पुन्हा नांदणीच्या भूमीत दाखल झाल्याने ग्रामस्थांच्या भावनिक नात्याला नवी उभारी मिळाली आहे.

Total Visitors :
4839399
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *