संगमेश्वर : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली असतानाच संगमेश्वर तालुक्यात एसटी बसचा धक्कादायक अपघात घडला. वाशी पुनर्वसन ते संगमेश्वर मार्गावर वाशी गोटलवाडी आणि सोनवडे गावांदरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास धावत्या एसटी बसचा एक्सल अचानक निखळल्याने बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या मधोमधच बंद पडली.
सकाळची वेळ असल्याने बसमध्ये शाळकरी विद्यार्थी तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होती. बस अचानक बिघडल्याने प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेत एका शालेय विद्यार्थिनीला मुका मार लागला असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
अपघातानंतर बस रस्त्याच्या मध्यभागी आडवी उभी राहिल्याने मार्गावरील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आधीच या मार्गावर प्रवाशांची व वाहनांची वर्दळ वाढली असताना एसटी बंद पडल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. बस हटविण्याचे काम सुरू होईपर्यंत वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडून प्रवासी वाहतुकीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले जात असले, तरी धावत्या बसचा एक्सल निखळल्याच्या घटनेमुळे बसच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मेकॅनिकल वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने वाहनांची तपासणी आणि देखभालीवर त्याचा परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रवासी एसटीवर अवलंबून असताना अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन एसटी प्रशासनाने वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा आढावा घ्यावा, तसेच रत्नागिरीचे पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित यंत्रणेकडून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
संगमेश्वर : धावत्या एसटीचा एक्सल निखळला; विद्यार्थिनी जखमी
Leave a Comment





