विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकाची भूमिका; अध्यापनातून घेतला शिक्षकत्वाचा अनुभव

Gramin Varta
111 Views

प्रचितगड माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात; दहीहंडी उत्सवाने भरली रंगत

संगमेश्वर (दिनेश आंब्रे): प्रचितगड माध्यमिक विद्यालय, कारभाटले येथे भारताचे माजी राष्ट्रपती तथा थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील विद्यार्थ्यांनी थेट शिक्षकाची भूमिका साकारत प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने विविध वर्गांवर जाऊन विषय समजावून सांगणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे आणि वर्गनियंत्रण सांभाळण्याची जबाबदारी चोख पार पाडली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांचे कार्य, संयम, जबाबदारी आणि अध्यापनामागील कष्टांची प्रत्यक्ष जाणीव झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून देणारी विचारगर्भ मनोगते व्यक्त करत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि गुरु-शिष्य परंपरेचा आदर्श जपण्याचा संकल्प केला.

विद्यालयाचे मुख्याध्यापक धनाजी बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. यावेळी सहशिक्षक समीर आत्तार, धनाजी भांगे, किशोर चांदे, शिक्षकेतर कर्मचारी संभाजी घोरपडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, कठोर मेहनत आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

दरम्यान, विद्यालयात पारंपरिक दहीहंडी उत्सवाचेही आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेत थर रचून दहीहंडीचा आनंद लुटला. अध्यापनाचा वस्तुपाठ आणि दहीहंडीचा जल्लोष यामुळे प्रचितगड विद्यालयाचा परिसर दिवसभर उत्साहाने दुमदुमून गेला होता.

Total Visitors :
4810903
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *