शिवणे येथे चरण्यास नेलेल्या गुरांच्या कळपावर झडप; पाडा जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
संगमेश्वर : तालुक्यातील करंबेळे येथील शेतकऱ्याच्या दोन वर्षांच्या पाड्यावर बिबट्याने दिवसाढवळ्या हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिवणे गावातील बारकोंबडा परिसरात घडली. या हल्ल्यात संजय भिकाजी पानगले यांच्या पाड्याच्या मानेवर जखम झाली असून, वेळीच आरडाओरड केल्याने बिबट्या जंगलाच्या दिशेने पसार झाला. दिवसाढवळ्या बिबट्याचा वावर आणि हल्ल्याच्या घटनांमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
करंबेळे येथील महाडिकवाडीतील संजय पानगले यांच्याकडे सात ते आठ पाळीव जनावरे आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी ते आपली गुरे चरण्यासाठी शिवणे गावातील बारकोंबडा परिसरात घेऊन गेले होते. काही वेळाने पानगले घरी जाऊन भाकरी खाऊन पुन्हा गुरांकडे परतले. त्यावेळी अचानक गुरांचा मोठ्याने हंबरडा ऐकू आला.
आवाजाच्या दिशेने पाहिले असता, एका दोन वर्षांच्या पांढऱ्या रंगाच्या पाड्याच्या मानेवर बिबट्याने झडप घातल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पानगले यांनी आरडाओरड करताच तसेच गुरांनी केलेल्या हंबरड्यामुळे बिबट्या घाबरला आणि त्याने पाड्याला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या हल्ल्यात पाड्याच्या मानेवर जखम झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाला कळविण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी जखमी पाड्यावर उपचार केले.
दरम्यान, संगमेश्वर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे चित्र असून, यापूर्वी शेवरेवाडी येथे नाचरे यांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. तसेच ताम्हाणे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत आहे. वांझोळे-सुवारेवाडी येथे घरात घुसून कोंबड्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याने प्रतिभा दळवी यांच्यावरही हल्ला केल्याची घटना घडली होती.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून, वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
देवरुख: करंबेळेतील शेतकऱ्याच्या पाड्यावर दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला
Leave a Comment



