सलग दुसऱ्या वर्षी पटकावले रौप्य पदक
रत्नागिरी: मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि कोकण विभागाने सलग दुसऱ्या वर्षी रौप्य पदक पटकावून नवा इतिहास रचला आहे. मुंबई विद्यापीठ आणि एस. एम. शेट्टी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय (स्वायत्त), पवई यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२६ दरम्यान मुलुंड येथील कालिदास क्रीडा संकुलात या स्पर्धा पार पडल्या.
या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत कोकण विभाग क्रमांक ४ च्या महिला बॅडमिंटन संघात गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची कु. श्रुती फणसे (एम.ए. भाग-१), कु. चार्वी कापडी (एस.वाय.बी.कॉम.), बॅ. बी. के. कॉलेज वेंगुर्लेची कु. सबा शेख तसेच एस. आर. एम. कॉलेज कुडाळच्या कु. श्रेया सामंत आणि कु. मैथिली ठाकूर यांची निवड झाली होती. संघाचे नेतृत्व करताना कर्णधार कु. श्रुती फणसे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवत संघाला अंतिम फेरीत धडक मारून दिली. तिच्या नेतृत्वाखाली संघाने सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदासह मानाचे रौप्य पदक आपल्या नावे केले.
या ऐतिहासिक यशासाठी महिला बॅडमिंटन संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे आणि श्री. अब्दुलसमद शेख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर श्री. माधव फणसे व क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांचे सहकार्य लाभले.
सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन करून कोकण विभागाचा आणि महाविद्यालयाचा गौरव वाढवल्याबद्दल र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.





