रत्नागिरी जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोफत कलम, रोपं  वाटप संपन्न

Gramin Varta
136 Views

चार तालुके, ९ गावे, ६१३ शेतकरी, ४११६ कलम – रोपाचे वाटप: दापोलीतील नवभारत छात्रालय परिवार आणि अश्विनी ऍग्रो फार्म यांचा संयुक्त उपक्रम

संगमेश्वर : कुणबी सेवा संघ, दापोली अंतर्गत नवभारत छात्रालय परिवार आणि सौ. सुषमा आणि प्रा. प्रभाकर शिंदे यांचा अश्विनी ऍग्रो फार्म यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड, चिपळूण आणि लांजा या पाच तालुक्यातील ९ गावांमधील ६१३ शेतकऱ्यांना एकूण रु. २३०७४५/- किंमतीच्या ४११६ कलम – रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही संस्था सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गेली बारा वर्षे हा उपक्रम राबवित आहेत. यंदा या उपक्रमाचे हे तेरावे वर्ष आहे.

मोफत कलमे / रोपे वाटप उपक्रमाचा रत्नागिरी जिल्ह्यातील चार तालुक्यामधून लाभ घेतलेल्या ६१३ शेतकऱ्यापैकी दापोलीतील ओननवसे (50), तेरेवायंगणी (७५), सोवेली (६०), भाटघर (६०) व रुखी (६०) या पाच गावांमधील ३०५ , मंडणगड मधील म्हाप्रळ (७०) आणि तोंडली (९०) या दोन गावातील १६०, चिपळूण मधील दळवटणे गावातील ४८ आणि लांज्यामधील चाफेट गावातून १०० शेतकरी समाविष्ट होते.

या उपक्रमांतर्गत मु. म्हाप्रळ (मंडणगड), मु. चाफे (लांजा), मु. ओणनवसे, मु. तेरेवायंगणी, मु.सोवेली, ता. दापोली व मु. दळवटने (चिपळूण)या  गावातील प्रत्येक शेतकऱ्याला चार कोकम रोपे, दोन काळीमिरी रोपे आणि दोन वर्षाचे एक चिकू कलम मोफत पुरविण्यात आले. तर मु. रुखी, मु. सोवेली (दापोली) व मु. तोंडली (मंडणगड) गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला दोन कोकम रोपे, दोन लिंबू रोपे, दोन काळिमिरी रोपे, आणि दोन वर्षाचे एक चिकू कलम  पुरविण्यात आले.

मोफत पुरविण्यात आलेल्या ४११६ कलमा रोपांची किंमत होती २३०७४५ /-. यामध्ये ९५६००/- रुपयांची १९१२ कोकम रोपे, रुपये ३११५०/- किमतीची १२४६ काळीमिरी रोपे, रुपये ८७२२२०/- किंमतीची ६२३ दोन वर्षाची चिकू कलमे आणि रुपये १६७७५/- ची ३३५ लिंबू रोपे, रुपये २५०/- ची ५ फणस रोपे व रुपये ७५०/- ची १५ जांब रोपे यांचा समावेश होता. यापैकी एकूण रु.१,२०, ३७५/-  किंमतीची १९१२ कोकम रोपे, ५० चिकू कलमे आणि ३३५ लिंबू रोपे, ५ फणस रोपे व १५ जांब रोपे नवभारत छात्रालय परिवाराच्या कृषि केंद्रामधून पुरविण्यात आली, तर एकूण रु.१११३७०/- किंमतीची १२४६ काळीमिरी रोपे आणि ५७३ चिकू कलमे अश्विनी ऍग्रो फार्म मधून पुरविण्यात आली.

मोफत कलमे-रोपे वाटप करण्यासाठी सर्व गावांमध्ये संस्थेचे पदाधिकारी डॉ. प्रमोद सावंत, उपाध्यक्ष, श्री. प्रभाकर तेरेकर, सदस्य व श्री. सुनील गुरव, सदस्य यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संस्थेच्या उपक्रमाविषयी माहिती दिली तसेच फळझाडांच्या लागवडीविषयी तांत्रिक मार्गदर्शन प्रा. प्रभाकर शिंदे, अध्यक्ष व डॉ. राजन खांडेकर, सदस्य, कुणबी सेवा संघ, दापोली यांनी केले आणि लागवडीचे अर्थशास्त्रही पटवून दिले. तसेच यावर्षी वाटप कार्यक्रमाच्या वेळी लागवडीचे प्रत्यक्षिकही दाखविण्यात आले.

मोफत कलमे रोपे वाटप करण्यासाठी संस्था आणि गावातील पदाधिकारी आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वय राखण्यामध्ये आणि अंमलबजावणीमध्ये अनेक व्यक्तींनी परिश्रम घेतले. त्यामध्ये ओनणवसे येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अविनाश पाटील, कृषि महाविद्यालय, दापोलीच्या विस्तार शिक्षण विभागातील कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रवीण झगडे आणि ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमातील कृषि कन्या, कुणबी समाजोन्नत्ती संघाच्या मंडणगड शाखेचे अध्यक्ष दिनेश सापटे, कुणबी सेवा संघ, लांजा चे अध्यक्ष शांताराम गाडे, दापोली पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी दिनेश राणे, कुणबी सेवा संघाचे खजिनदार प्रदीप इप्ते,  सदस्य सुनील गुरव यांचा समावेश होता.

शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कलमे – रोपे पुरविणे, कलमे -रोपे वाटप आणि मार्गदर्शन कार्यक्रमाचे वेळापत्रक तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे,  ही सर्व कामे अत्यंत नियोजन पूर्वक करण्याचे काम कुणबी सेवा संघांचे सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर यांनी केले, त्यामुळेच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला.

कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, डॉ. राजन खांडेकर, सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य प्रभाकर तेरेकर, दिनेश राणे, सुनिल गुरव,  शिवप्रसाद चौगुले यांनी परिश्रमपूर्वक या समजोपयोगी कार्यक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली. सर्वच गावातील पदाधिकारी, शेतकरी आणि महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले. विशेषतः कुणबी सेवा संघांचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे आणि अश्विनी ऍग्रो फार्मसच्या सौ. सुषमा शिंदे आणि राजकिरण शिंदे यांचे मनापासून आभार मानले. या सर्वांनी वाटप केलेल्या कलमा रोपांची योग्य प्रकारे लागवड करू, त्यांची निगा राखू आणि संस्थेचे ऋण फेडू अशी ग्वाही दिली.

कुणबी सेवा संघांचे कर्मचारी सुनील ठाकूर, सौ. वर्षा गोरीवले, सौ. रेणुका शिंदे, सौ. कीर्ती घाग, सुजित गोलांबडे, समीर शिबे, सौ. रिया पागडे, श्रीमती सुवर्णा अबगुल, सौ. मानसी मुलुख आणि सौ. श्रावणी गावडे यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी विशेष परिश्रम घेतले

Total Visitors :
4779415
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *