देवरुखमध्ये सामाईक जागेच्या वादातून वृद्ध भावावर दांडक्याने हल्ल्याचा प्रयत्न; धमकीप्रकरणी सख्ख्या भावाविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
65 Views

देवरुख : सामाईक जागेवरून सुरू असलेल्या वादातून सख्ख्या भावाने ७१ वर्षीय भावाला शिवीगाळ करत ओलसर कुजलेल्या दांडक्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील अमृतनगर परिसरात घडली. या हल्ल्यात दांडका पायाच्या पोटरीवर लागल्याने विजय धोंडू चाळके हे जखमी झाले असून, त्यांना धमकी दिल्याप्रकरणी त्यांचे सख्खे भाऊ मिलिंद धोंडू चाळके यांच्याविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ वाजल्यापासून २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंतच्या कालावधीत आनंदी कुंज, अमृतनगर, देवरुख येथे हा प्रकार घडला. विजय चाळके हे त्यांच्या राहत्या घरी आले असताना त्यांचे भाऊ मिलिंद चाळके तेथे आले. दोघांमध्ये सामाईक जागेवरून पूर्वीपासून वाद असल्याने आरोपीने विजय यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. यावेळी आरोपीने विजय यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांची पत्नी घराबाहेर आली.

दरम्यान, पत्नी मोबाईलवर शूटिंग करत असल्याचे सांगत आरोपीने जमिनीवर पडलेला ओलसर व कुजलेला दांडका हातात घेतला आणि विजय यांच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या पत्नीने वेळीच बाजूला केल्याने दांडका डोक्याला न लागता विजय यांच्या उजव्या पायाच्या पोटरीवर लागला. त्यानंतरही आरोपीने शांत न होता शिवीगाळ व दमदाटी सुरूच ठेवली. तसेच विजय व त्यांच्या पत्नीच्या दिशेने दांडका उगारून हात-पाय तोडून टाकण्याची आणि येथेच गाडून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीने पोलिसांना मॅनेज केल्याचे सांगत वकिलासंदर्भातही दमदाटी केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. २५ ऑगस्ट रोजी सकाळी पुन्हा शिवीगाळ व धमकी दिल्याने विजय चाळके यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Total Visitors :
4760800
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *